उल्हास पाटलांनी लेकीसाठी भाजपची वाट धरली… पण रक्षा खडसे, अमोल जावळे आधीच तिकीटाच्या स्पर्धेत!
जळगाव : पूर्वीच्या जळगाव मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ullhas Patil) आणि त्यांची कन्या, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील (Ketaki Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या बुधवारी (24 जानेवारी) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. डॉ. केतकी पाटील या मागील बऱ्याच दिवसांपासून रावेर लोकसभेसाठी तयारी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच त्या भाजपमध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे. (Former MP Dr. Ulhas Patil and his daughter Dr. Ketki Patil is going to join BJP)
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेत्यांमध्ये पक्षबदलाचे वारे वाहत आहे. गत आठवड्यात काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यानंतर आता डॉ. उल्हास पाटील यांच्या रुपाने आणखी एक माजी खासदार काँग्रेस सोडणार आहेत. पाटील यांचे काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्यांमध्ये नाव घेतले जात होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील नेत्यांमध्ये डॉ. पाटील यांचे नाव घेतले जात होते. मात्र रावेर मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनी भाजपची वाट धरली असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव : काँग्रेसचे माजी खासदार कन्येसह भाजपच्या वाटेवर; रक्षा खडसेंना थांबविले जाणार?
पूर्वी एरंडोल आणि जळगाव हे दोन मतदारसंघ अस्तित्वात होते. आता एरंडोल हा जळगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तर जळगाव मतदारसंघ हा रावेर लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच पूर्वीच्या जळगाव मतदारसंघातून 1998 मध्ये काँग्रेसने उल्हास पाटील उमेदवारी दिली होती. त्यावेळी जळगाव जिल्हा हा भाजपचा गड झाला होता. अशा स्थितीतही त्यांनी तब्बल 56 हजारांच्या मताधिक्याने विजय नोंदविला होता. मात्र अवघ्या 13 महिन्यात लोकसभा बरखास्त झाल्या आणि निवडणुका जाहीर झाल्या. पुन्हा झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र अवघ्या 13 महिन्यांच्या कालावधीतही त्यांनी जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामे मंजूर करुन आणली होती.
वैद्यकीय कॉलेज अन् रावेरचा मतदारसंघ ठरले कारण :
कोरोना काळात डॉ. उल्हास पाटील यांच्या मेडिकल कॉलेजची शासनाला सादर केलेल्या बिलांबाबत चौकशी सुरु होती. तेव्हापासून ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती. पण महाविकास आघाडीत जागावाटपामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे येईल आणि तिथून आपल्या मुलीला उभे करता येईल अशी योजना असल्याने त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचे बोलले जात होते. उल्हास पाटील यांच्यानंतर या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळविता आलेला नाही. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीकडून रावेरच्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच आता हा त्यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.
Ram Mandir : अयोध्येतील नव्या राजकीय मोदी रामायणाचा श्रीरामांशी संबंध नाही; ठाकरे गटाचा टोला
उमेदवारी मिळणार का? सस्पेन्स कायम
केतकी पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपासून तयारी सुरु केली आहे. नुकतेच त्यांनी गाव तिथे संपर्क अभियान राबविले होते. या अभियानाला अपेक्षित प्रतिसादही मिळाल्याच्या दावाही त्यांनी केला होता. या दरम्यानच्या काळात त्यांनी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात भाजपचे नेते डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांची भेट घेतली होती. त्यानंतर डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तिथूनच्या त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले गेले.
पण त्यांना उमेदवारी मिळणार का? रावेरच्या भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना थांबवून केतकी पाटील यांना तिकीट दिले जाणार का? असे सवाल सध्या विचारले जात आहे. याचे कारण उल्हास पाटील यांचा समर्थक गट आता फारसा प्रभावी राहिलेला नाही. याशिवाय रक्षा खडसे यांच्या रुपाने भाजपकडे तगडा उमेदवार आहे. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांच्याविरोधात त्या निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.
सोबतच भाजपचे माजी खासदार हरीभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे हेही प्रमुख दावेदार आहेत. त्यांना भाजपने यापूर्वीच मतदारसंघाची जबाबदारी सुद्धा सोपवली आहे. हे दोघेही जळगावमधील प्रभावी मानल्या जाणाऱ्या लेवा पाटील समाजाच्या मोठ्या नेत्यापैकी एक आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉ. पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला तिकीट देण्याची रिस्क भाजप घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.