पुण्यात भाजपच्या माजी नगरसेवकांसह 35 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : कसबा (Kasba)विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election)रविवारी मतदान (Voting)झालं. यावेळी शहरातील चार पोलीस (Police)ठाण्यांत उमेदवारांसह दोन माजी नगरसेवक आणि 30 ते 35 जणांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका घटनेमुळं गंजपेठेत (Ganj Peth)तणाव निर्माण झाला होता. रविवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्ते गंज पेठ चौकीसमोर जमा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पैसे वाटपावरुन झालेल्या वादातून दोन गटात मध्यभागातील गंज पेठेत वाद झाला.
वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. परस्पर विरोधी फिर्यादीनंतर दोन्ही गटातील 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळं गंजपेठेत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्ते गंज पेठ चौकीसमोर जमा झाले.
पुणे : हेमंत रासने यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल?
याबाबत नीता किशन शिंदे (42, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर, निर्मल हरिहर, हिरा हरिहर यांच्यासह 15 ते 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नीता शिंदे रात्री घरी होत्या. त्यावेळी विष्णू हरिहर आणि 15 ते 16 जण गंज पेठेत आले. शिंदे यांनी पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन त्यांचा भाऊ कुणाल यास धक्काबुक्की व मारहाण केली. शिंदे आणि त्यांच्या मावशीलाही धक्काबुक्की केली.
भाजप कार्यकर्ते हिरालाल नारायण हरिहर (67, रा. गंज पेठ) यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक राहुल जोग यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं समजतंय.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केलीय. मतदान करताना त्यांनी पक्षाच्या चिन्हाचे उपरणं खांद्यावर ठेवलं होतं. तर समर्थ पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी युवक कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष फैय्याज शेख यांनी फिर्याद दिलीय. त्यानुसार बिडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झालाय.