मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी रस्ता वळवला, अपघातातील जखमी शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
पुण्यात अपघातांची मालिका सुरुच असून आज पुन्हा एकदा कात्रज–कोंढवा रस्त्यावर एका शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला.
A teacher lost her life on the Katraj-Kondhwa road : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. आज पुन्हा एकदा कात्रज–कोंढवा रस्त्यावर एका शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. कात्रज-कोंढवा रोडवरील(Katraj-Kondhwa Road) इस्कॉन चौकानंतर हनुमान मंदिराजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात(Accident) दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली होती. उपचारासाठी रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आले असता तिचा मृत्यू झाला. रमा कापडी (वय 53, रा. कात्रज–कोंढवा रोड) असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या जे.एस.पी.एम. शिक्षण संस्थेत शिक्षिका होत्या. रमा कापडी यांच्या पतीचे सुमारे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या आई आणि मुलीसोबत राहत होत्या. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठा बाका प्रसंग ओढावला आहे.
घटनेतील गंभीर बाब म्हणजे आज कोंढवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadanvis) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमामुळे कोंढवा रोडवरील वाहतूक तळ्याजवळ वळवण्यात आली होती. अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल शिवसेना नेते वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना सुचना न मिळाल्याने हा बळी गेला असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, कात्रज–कोंढवा रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून अद्याप ते पूर्ण झालेले नाही. या अपूर्ण रस्त्यामुळे यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून शेकडो निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आजच्या घटनेतही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने जखमी महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षात या रस्त्यावर हा 25 वा बळी गेल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेमुळे एक मुलगी अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
