तो ‘राडा’ निंदनीय, निषेधार्ह, लज्जास्पद! माजी विद्यार्थी अन् कला शिक्षक ललित कला केंद्राच्या पाठिशी

तो ‘राडा’ निंदनीय, निषेधार्ह, लज्जास्पद! माजी विद्यार्थी अन् कला शिक्षक ललित कला केंद्राच्या पाठिशी

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Kranti Jyoti Savitribai Phule Pune University) ललित केंद्रात (Fine Arts Center) झालेला राडा राज्यात चर्चेचा विषय ठरला. केंद्रातील विद्यार्थ्यांकडून रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ‘जब वी मेट’ नावाच्या नाटकात या कलाकरांचे वैयक्तिक आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या नाटकावरून मोठा राडा झाला. भाजप युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. केंद्राची तोडफोड करण्यात आली. (Alumni, art teachers, visiting faculty and theatre/cinema artists of the Fine Arts Center presented a statement.)

यानंतर पुणे पोलिसांनी ललित कला केंद्राच्या प्रमुखांसह सहा जणांना अटक केली आणि त्यांना जामिनही मिळाला. शिवाय पोलीस उपनिरीक्षक सचिन शंकर गाडेकर यांनाही निलंबित करण्यात आली. ललित कला केंद्राच्या आवारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गाडेकर यांनी योग्य ती दखल घेतली नाही. तेथे शीघ्र कृती दलाला (रॅपिड ॲक्शन फोर्स) बोलाविले नाही, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती त्वरीत कळविली नाही. जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना कर्तव्यात कसुरी केली, असा ठपका ठेवला.

मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’

या घडामोडी एका बाजूला असतानाच आता ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थी, कला शिक्षक, व्हिजिटिंग फॅकल्टी आणि थिएटर/सिने कलाकार यांनी एक निवदेन सादर करत झाल्या प्रकाराबद्दल आपली बाजू स्पष्ट केली. या निवदेनात त्यांनी भाजप युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून घडलेले वर्तन अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे आणि कायदेशीर कारवाईयोग्य आहे. आम्ही ह्या झाल्या प्रकाराचा तीव्र निषेध करतो. ही घटना लजास्पद आहे, असेही मत नोंदविले आहे. तसेच आपल्यावर झालेल्या हल्ल्याची दखलही न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

काय म्हटले आहे निवदेनात?

आम्ही विविध वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेले संवेदनशील कलाकार आणि भारताचे नागरिक या नात्याने एकत्रितपणे हे जाहीर करत आहोत. आम्ही सर्व धर्म, जाती, पंथ, संप्रदाय ह्यांचा आदर करतो. आम्हाला आमच्या समृद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरांचा अभिमान आहे. ललित कला केंद्र (गुरुकुल), ज्याला सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स म्हणूनही ओळखले जाते. हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक विभाग आहे, जो पारंपारिक भारतीय गुरुकुल प्रणालीमध्ये नृत्य, संगीत आणि नाटक ह्यांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देतो. ललित कला केंद्र (गुरुकुल) द्वारे चालवले जाणारे सर्व अभ्यासक्रम UGC मान्यताप्राप्त आहेत.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्मश्री सतीश आळेकर (ज्यांनी 2009 पर्यंत एचओडी म्हणूनही काम केले होते), पंडिता रोहिणी भाटे यांसारखे परफॉर्मिंग कलांमधील अनेक मान्यवर कलाकार या विभागाशी जोडले गेले आहेत. अनेक दिग्गज विभागाच्या अभ्यासक्रम मंडळाशी संलग्न आहेत. हे दिग्गज विद्यार्थ्यांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शनही करतात. गेल्या काही वर्षांमध्ये, ललित कला केंद्राने (गुरुकुल) अनेक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी घडवले आहेत जे आजही नाट्य, संगीत, नृत्य, कलाशिक्षण, दूरचित्रवाणी मालिका आणि सिनेमा या क्षेत्रांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अशा प्रकारे हा विभाग कलेच्या जगात प्रवेश करण्याची एक अमूल्य पायरी आहे यावर आमचा उत्कट विश्वास आहे.

अहमदनगरमध्ये जिल्हाध्यक्षांचाच काँग्रेसला मोठा धक्का; नागवडे दाम्पत्य राष्ट्रवादीच्या वाटेवर

संगीत, नृत्य, नाटक ह्यांना प्रयोग कला म्हणतात कारण त्यात नवनवीन प्रयोग करणे अभिप्रेत असते. प्रयोगकलांच्या विद्यार्थ्याने शरीर, आवाज, विचार, आपली मते ह्याच्यांवर विविध अंगांनी काम करणे गरजेचे असते. दरवर्षी नाट्य विभागाचे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेअंतर्गत विविध विषयांवर नाट्यप्रयोग सादर करतात. विद्यार्थी लिखित नाटके ते उस्फुर्त नाटके, प्रस्थापित दिग्दर्शकांनी आणि विद्यार्थी दिग्दर्शकांनी रचलेली नाटके, आहार्य (शरीर) अभिनयआधारित ते वाचिक अभिनयाआधारित नाटके, लोककला ते अभिजात नाटके अशी विविध नाटकांचे प्रकार हाताळून बघतात. ही वैविध्यपूर्ण स्वरुपाची, आशयाची, पारंपारिक आणि आधुनिक अशी नाटके सादर करणे ही चालत आले आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतःतील कलाकार शोधताना आपली सर्जनशीलता आणि तंत्र घालत कला कशी जोपासता येईल? ह्याचे शिक्षण ललित कला केंद्र देते आहे, हेच ह्या विभागाचे दुर्मिळ सौंदर्य आहे. ही परंपरा जतन करायला हवी, त्याचे समर्थन करणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. ललित कला केंद्र (गुरुकुल) विद्यापीठाच्या नियमांनुसार लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेते. दरवर्षी, त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून नाटकाचे विद्यार्थी त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा म्हणून विविध विषयांवर नाटके सादर करतात. आपण असे म्हणू शकतो की अशा परीक्षांच्या वेळी, रंगमंच हाच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका असतो. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या मूल्यमापनासाठी अंतर्गत आणि/किंवा बाह्य परीक्षक/तज्ञ उपस्थित असतात.

या परफॉर्मन्समध्ये तोंडी परीक्षा (Viva) हा पण मूल्यमापन प्रक्रियेचा एक भाग असतो. या सादरीकरणांमध्ये कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असत नाही. संहिता ते प्रयोग (स्क्रिप्ट टू परफॉर्मन्स) हे नाटक अभ्यासक्रमातील एक महत्त्वपूर्ण मॉड्यूल आहे. ह्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे 15 मिनिटांचे नाटक लिहिण्याचा आणि सादर करण्याचा प्रयत्न करतात. हा उपक्रम साधारण 1990 पासून चालू आहे. ह्या उपक्रमाच्या निमित्ताने आजपर्यंत अधिक नाटके सादर केली गेली आहेत.

हे लज्जास्पद कृत्य :

ललित कला केंद्र येथे 2 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी संहिता ते प्रयोग परीक्षेला उपस्थित असलेल्या एका गटाला एका संहितेच्या सादरीकरणाचा चुकीचा अन्वयार्थ लागला. त्या गटाने विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक, परीक्षक आणि प्रेक्षक ह्यांना अडथळा करत चालू प्रयोग थांबवला. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली, शिक्षकांना धमकावण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली. हे वर्तन अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे आणि कायदेशीर कारवाईयोग्य आहे. आम्ही ह्या झाल्या प्रकाराचा तीव्र निषेध करतो.

चर्चेतून वादविवाद करत नवनवीन कल्पनांना जन्म देण्याच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या देशात हा गट धमक्या- गैरवर्तन- हिंसाचार करतो हे लज्जास्पद आहे. हे कृत्य आमच्या विद्यापीठाच्या परीक्षाप्रणालीचे विचित्र उल्लंघन आहे आणि जे दहशत वाढवणारे आहे. त्या संध्याकाळी सादर झालेल्या कोणत्याही नाटकाच्या सादरीकरणाबाबत जर कुणा प्रेक्षकाला आक्षेप असेल, तर ती व्यक्ती औपचारिकपणे विभागप्रमुख किंवा विद्यापीठ प्रशासनाकडे त्यांचे आक्षेप नोंदवू शकते. तशी तरतूद आहे. पण तसे झाले नाही.

उलट विद्यापीठातील विद्यार्थी आणि विभागप्रमुख ह्यांच्या विरोधात थेट पोलिस तक्रारी नोंदवल्या गेल्या. हे अत्यंत दुःखदायक आहे. शिवाय त्यावेळी विद्यार्थ्यांना/विद्यार्थिनींना झालेल्या धक्काबुक्कीची दखल घेतली गेली नाही. तक्रार नोंदवून घेतली गेली नाही. हे अनाकलनीय आहे. विभाग, त्याचे विद्यार्थी आणि विभागप्रमुख हे या घटनेचे खरे बळी आहेत. त्यांना आता अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात आहे. त्यांची जाणूनबुजून बदनामी केली जात आहे.

जे व्हिडिओज प्रसारित (व्हायरल) केले जात आहेत, ज्या गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या जात आहेत (सोशल मिडिया तसेच इतर ठिकाणी) त्यातून चुकीची माहिती देऊन संस्थेबद्दल गंभीर गैरसमज निर्माण झाले आहेत. सध्याचे विभागप्रमुख प्रविण भोळे हे गेली अनेक वर्षे नाट्यशिक्षक, अभ्यासक आणि रंगकर्मी आहेत. ते ह्या विभागाशी गेली अनेक वर्षे सबंधित आहेत. विद्यार्थ्यांच्या नाटक ह्याविषयीच्या जिज्ञासेमध्ये ते आनंदाने भर घालत असतात. त्यांच्या बद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन केलेली शेरेबाजी ही अस्वस्थ करणारी आहे.

आम्ही सर्वांना आवाहन करतो की कृपया ही अनुचित निंदा आणि बदनामी थांबवावी. आम्ही विनंती करतो की विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी आमच्या सर्व प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसे संरक्षण द्यावे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. आम्ही सर्व गट, संस्था, विद्यार्थी, कलाकार आणि कलाप्रेमी मंडळींना आवाहन करतो की त्यांनी भारतीय राज्यघटना आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करावा. आम्ही ललित कला केंद्राच्या (गुरुकुल) विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांसोबत एकजुटीने उभे आहोत. जय हिंद!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube