Arvind Shinde : ५०० कोटींचे काय केले? हेमंत रासनेंकडे भाजप कधी ‘ईडी’ पाठवणार?
पुणे : पुणे महापालिकेचे ७ कोटींचे अंदाजपत्रक आहे. भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी चार वर्षात एकूण २८ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक (Budget) मांडले. ज्या भागातून ते निवडून येतात त्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकास कामांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली. स्वतःच मांडलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी स्वतःच करत होते. मात्र, आश्चर्यांची बाब तुम्हाला सांगतो. हेच हेमंत रासने आणि भाजपची लोकं पुढे पुणे महापालिकेसमोर उपोषणाला बसले. उपोषणाचे कारण काय तर म्हणे आमच्या प्रभागात विकासकामेच झाली नाही. मग माझा भाजपला प्रश्न आहे की हेमंत रासने यांनी त्या ५०० कोटी रुपयांचे काय केले. रासने यांच्या घरी ईडी (ED), सीबीआय (CBI) कधी पाठवताय, असा हल्ला भाजपवर काँग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी केला.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
अरविंद शिंदे म्हणाले की, विकासकामात जर ५०० कोटी रुपयांची तरतूद करून जर कामे होत नसतील तर चार वर्षात अंदाजपत्रक सादर करून तुम्ही काय केले. हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने भाजपचा उमेदवार हेमंत रासने हे जेव्हा मतं मागायला येतील. तेव्हा त्यांना ५०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे काय झाले याबद्दल नक्की विचारा.
भारतीय जनता पार्टीला ईडी, सीबीआय, सीआयडी, इन्कम टॅक्स, पोलीस याची लई आवड आहे. मग एकदा कधीतरी भाजपने हेमंत रासने यांच्या घरी ईडी पाठवावी आणि विचारावे की ५०० कोटी रुपयांचे काय केले, असे आव्हान देत अरविंद शिंदे म्हणाले की, जर ५०० कोटी रुपये देऊनही विकास कामे न करणाऱ्याला जर उमेदवारी देत असेल तर भाजपचा निकष काय आहे, हे लक्षात येते. प्रत्येक मतदारांनी भाजपला हा प्रश्न विचारावा.