तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही सहन करणार, असं होणार नाही; महेश लांडगेंचा अजित पवारांना स्पष्ट इशारा
अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर, आमदार लांडगेंनीही आक्रमक भूमिका घेत दादांना दिलं जोरदार प्रत्युत्तर.
BJP MLA Mahesh Landge gave a telling warning to Ajit Pawar : महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असला, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोपांची धग काही शमलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर, आमदार लांडगेंनीही आक्रमक भूमिका घेत दादांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांवर टीका करताना महेश लांडगे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या दादाला आज गल्लीबोळात फिरावं लागतंय. 100-200 लोकांमध्ये सभा घ्यायची वेळ आली आहे, हे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी चांगलं नाही.’
लांडगेंनी अजित पवारांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत म्हटलं, ‘याच महाराष्ट्राच्या दादांनी शेतकऱ्यांना एकदा विचारलं होतं धरणात पाणी नाही तर काय करू? आम्ही कधीच असं लोकांना म्हटलं नाही. पाण्यासाठी आम्ही शहरात पाइपलाईन टाकल्या, जलवाहिन्या उभारल्या आणि पाणी आणलं.’ पवना जलवाहिनी बंद का पडली, यावर चौकशी का झाली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अजित पवारांच्या वैयक्तिक टीकेवर प्रतिक्रिया देताना महेश लांडगे म्हणाले, ‘अजित पवारांनी योग्य वेळी पालकत्व स्वीकारलं असतं, तर आज उत्तरदायित्व मागायची वेळ आली नसती. राजकारणात अनेक लोक सरेंडर होतात, पण मी स्वाभिमानी आहे. मी त्यांना सोडल्यानंतर आजपर्यंत त्यांच्याकडे एकही काम घेऊन गेलो नाही.’ ‘तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही सहन करणार, असं होणार नाही,’ असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
ती फाईल बाहेर आली असती तर हाहाकार झाला असता; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवर थेट आरोप
पुढे बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, ‘आमच्या जाहीरनाम्याबाबत विरोधक दिशाभूल करत आहेत. आमची आश्वासनं अवास्तव नाहीत, ती पूर्णपणे व्यवहार्य आहेत. आम्ही घाईघाईने निर्णय घेतलेले नाहीत. लोकांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलं, मतं जाणून घेतली आणि त्यानंतरच निर्णय घेतले.’ 2017 मध्ये भाजप बहुमताने निवडून आल्यावर शहराच्या विकासाला गती मिळाली, असं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. ‘कोणताही आरोप करताना त्याला पुरावा असायला हवा. अजित पवारांनी आरोप केले, पण पुरावे नाहीत. मीही आरोप करू शकतो, पण मी त्यात पडत नाही. निवडणुकीच्या काळात आरोप होतच असतात’.
महेश लांडगेंनी अजित पवारांवर स्वार्थी राजकारणाचा आरोप करत म्हटलं, ‘लोकसभेत आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर उभे होते, तेव्हा माझं कौतुक केलं गेलं. म्हणजे काम असलं की महेश लांडगे चांगले, नाहीतर वाईट. परत गरज पडली तर पुन्हा आमच्याकडेच येतील.’ ‘माझ्या भावावर टीका केली, मग पार्थ पवार ऐवजी स्वार्थ पवार म्हणावं का? 1800 कोटींचे आरोप तुमच्या मुलावर झाले आणि वडील म्हणतात मला माहिती नाही. अशा खालच्या पातळीवर जाणं महाराष्ट्राच्या दादाला शोभत नाही,’ असा आरोपही त्यांनी केला.
राजकारणाच्या मर्यादा पाळण्याचं काम मी ठरवलं आहे, असं सांगत लांडगे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होणार आणि आमचं बहुमत येणार. माझी मान मजबूत आहे. पुढचा माणूस काय डाव टाकणार हे ओळखणं आमच्या रक्तात आहे.’ शेवटी त्यांनी अजित पवारांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला देत, ‘गल्लोगल्लीत सभा घ्यायची वेळ का आली, याचा विचार त्यांनीच करावा,’ असा टोला लगावला.
