Chandrashekhar Bavankule कोणावरही अन्याय नाही, ब्राह्मणांचे योगदान मोठे!
पुणे : भारतीय जनता पार्टीकडून (BJP) कोणत्याही जाती-धर्मावर अन्याय केला जात नाही. प्रत्येक जातीला योग्य संधी पक्षाच्या वतीने दिली जाते. मुक्ता टिळक यांचे निधन झाले नसते तर ही परिस्थिती उदभवलीच नसती. पण हरकत नाही. कसबा मतदार संघात टिळक कुटुंबा व्यतिरीक्त उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्याच्या मागे पक्षाची निश्चित अशी काहीतरी भूमिका असू शकते. त्यामुळे येथे नाराजीचा काही प्रश्नच येत नाही. प्रत्येकाला पक्षाची ध्येय धोरणं माहिती आहेत. त्यानुसार प्रत्येक जण कामाला लागला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी स्पष्ट केले.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. मात्र, या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाला उमेदवारी न मिळाल्याने कसबा पेठेतील ब्राह्मण समाज नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मतदार संघात ठिकठिकाणी नाराजीचे फ्लेक्स लावण्यात आल्याने भाजपची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पक्षाने टिळक कुटुंबा व्यतिरीक्त उमेदवारी देण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यांनी काही वेगळा विचार केला असेल. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की टिळक कुटुंबाला डावलले आहे. पक्ष प्रत्येक कार्यकर्ता, नेत्याचा व्यवस्थित विचार करतोच. ब्राह्मण समाजाने पक्षासाठी खूप काही दिले आहे. तसेच पक्षानेही केवळ ब्राह्मणच नाही तर प्रत्येक पक्षाला भरपूर काही दिले आहे.