अजितदादा खरंच निवडणूक लढणार नाहीत? बारामतीत येऊन नेमकं काय म्हणाले..
Ajit Pawar Speech in Baramati : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) पराभव झाला. आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी महायुतीने तयारी (Elections 2024) सुरू केली आहे. बारामतीत कुणाला तिकीट मिळणार (Baramati News) याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र अजित पवार यांच्या मनात वेगळंच काही सुरू आहे असे संकेत मिळू लागले आहेत. रविवारी अजित पवार बारामतीत होते. यावेळी त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवार यावेळी भाषणात म्हणाले.
शिंदेंना हव्यात 120 जागा, अजित पवार ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, भाजप काय निर्णय घेणार?
अजित पवार म्हणाले, मी आता 65 वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. आपण लाखांच्या मतांनी निवडून येणारी माणसं आहोत. यावेळी जमलेल्या लोकांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी मात्र अजितदादांनी घोषणा देणाऱ्यांना मध्येच थांबवलं आणि मनातली खंत व्यक्त केली. जेथे पिकतं तिथे विकत नाही. मी सोडून दुसरा एखादा आमदार बारामतीकरांना मिळाला पाहिजे. म्हणजे त्या आमदाराची आणि माझ्या कारकिर्दिची तुलना तुम्ही करा.
कार्यकर्त्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, पद असेल तरच काम करील. नाही तर करणार नाही अशी भूमिका आजिबात घेऊ नका. काही चुकत असेल तर जरूर मला सांगा. गावांतील ज्येष्ठ मंडळींना भेटा. त्यांचा आदर करा. संपूर्ण राज्यात मागील पाच वर्षात इतकी कामं झाली नसतील तितकी कामं एकट्या बारामतीत झाली, असे अजित पवार म्हणाले.
माझं प्राधान्य नेहमीच विकासकामांना असते. विकास करणे ही आपली जबाबदारीच आहे. काही महत्वाचे निर्णय घेत असताना लोकांची मतं देखील मी जाणून घेत असतो. कारण मत जाणून घेत असताना निर्णय घेताना त्याचा फायदाच होत असतो. निवृत्त अधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्याचाही मी नेहमीच प्रयत्न करत असतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.