Ajit Pawar : अजितदादांचं विमान दिल्लीच्या दिशेने; राजकीय चर्चांना उधाण
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडी आज पुण्यात घडत आहेत. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. काही काळ चर्चाही झाली. मात्र यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे वळसे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार बाणेर येथील प्रतापराव पवार यांच्या घरी एकत्र जमले होते. त्यानंतर काही वेळातच अजित पवार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाले. अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. मात्र आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी लगेचच दौऱ्यांना सुरुवात केली आहे.
Pune News : पवार ‘फॅमिली’ची दिवाळी! शरद पवार अन् अजितदादा पुन्हा एकत्र
अजित पवार आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार असल्याचे समजते. मात्र, अजितदादांचा हा दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे याची माहिती मिळालेली नाही. राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता त्यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात काय होणार याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, आज सकाळी शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी पवार कुटुंबिय एकत्र जमले होते. याआधी अजित पवार रक्षाबंधनाच्यावेळी आले नव्हते. त्यामुळे दिवाळीनिमित्त येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याआधी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर थोड्याच वेळात अजित पवार आणि शरद पवार प्रतापराव पवार यांच्या घरी एकत्र जमले होते. अजित पवार येण्याआधीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे येथे पोहोचले होते. त्यानंतर आता अजित पवार भाऊबीजेला पुन्हा येणार का याचंही उत्तर लवकरच मिळणार आहे.
राजकीय चर्चा झाली नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांची ही पहिलीच दिवाळी आहे. याआधी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात आले होते. त्यावेळीही अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, यावेळी या दोघांत काहीच चर्चा झाली नाही. अजित पवार यांनीही शरद पवार यांची नजर चुकवत तेथून काढता पाय घेतला होता. यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही नेते एकत्र जमले होते. त्यामुळे या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे शरद पवार यांनी सांगितले.