Ajit Pawar : माझ्या मुलानं मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं; अजितदादांच्या मातोश्रींची इच्छा
Ajit Pawar : राज्यात आज ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे गाव काटेवाडीतही ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत आहे. काटेवाडीत अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आज सकाळीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार यांनी गावात येत मतदान केलं. यानंतर अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आशताई पवार यांना पत्रकारांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, माझ्यासमोरच मुलानं मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं. अजितदादांवर लोकांचं खूप प्रेम आहे. पण पुढं काय सांगावं. सर्वांना वाटतं अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं. माझंही आता वय झालं आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यांसमोरच दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आशाताई पवार यांनी व्यक्त केली.
सख्खे मित्र बनले पक्के विरोधक! माजी IAS-IPS अधिकारी दोस्तांनी एकमेकांच्या विरोधात ठोकला शड्डू
अजितदादा मतदान करणार नाहीत?
अजित पवार मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे अजून तरी ते काटेवाडीत मतदानासाठी आलेले नाहीत. कदाचित ते मतदानासाठी येणार नाहीत अशी माहिती मिळत आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार म्हणाल्या, दादा आजारी आहेत त्यामुळे मतदानासाठी आले नाहीत. कुटुंबातील सगळे सदस्य येत आहेत. काटेवाडीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना दिसतोय का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, काटेवाडीत पक्षातील सर्वांनीच काम केलं आहे. राष्ट्रवादीचे इथे पहिल्यापासूनच वर्चस्व राहिलेले आहे. अनेक वर्ष मी स्वतः इथे लक्ष दिले आहे. त्यामुळे आम्हीच विजयी होणार आहोत.
काटेवाडीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी
राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 157 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी मतदान होत आहे. या ग्रामपंचायतीत मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे.
NCP च्या दोन्ही गटाकडून 5 राज्यांच्या निवडणुका न लढण्याचा निर्णय, नेमकं कारणं तरी काय?
काटेवाडी हे अजित पवार यांचं गाव आहे. सध्या अजित पवार यांना डेंग्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना मतदानासाठी येता येणार नाही अशीच शक्यता व्यक्त होत आहे. पवार कुटुंबिय दरवेळी मतदानासाठी जात असतात. परंतु, यावेळी अजित पवार आजारी आहेत. त्यामुळे ते पहिल्यांदाच मतदान करणार नाहीत.