भाजपने डोळे दाखवताच अजितदादा नरमले; चंद्रकांतदादांनी प्रस्तावित केलेली सर्व कामे मंजूर
पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली मात्र अडविण्यात आलेली कामे अखेर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी मंजूर केली आहेत. याशिवाय शिवसेनेच्या (Shivsena) सदस्यांनाही त्यांच्या कामांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर होणारा भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष टळला असल्याचे बोलले जात आहे. (Deputy Chief Minister and Guardian Minister Ajit Pawar approved the works of BJP and Shiv Sena)
काल (10 जानेवारी) तब्बल नऊ महिन्यांनंतर पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये ऑनलाईन पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2024-25 च्या 948 कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 135 कोटी आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 45 कोटी 84 लाख रुपये अशा एकूण एक हजार 128 कोटी 84 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
“दोन्ही दादांच्यामध्ये आमचे मरण…” : गोऱ्हेंनी विषय छेडताच अजितदादांनी मार्गी लावली शिवसेनेची कामे
या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.
यापूर्वी मे 2023 मध्ये चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. त्यानंतर महायुतीमध्ये अजितदादांची एन्ट्री झाली. पुण्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी यातील बहुतांश कामे अडवून ठेवली असल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच बहुतांश निधी अजित पवार गटाच्या आमदारांना आणि सदस्यांना देण्यात येत असल्याचा आरोपही दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी आणि आमदारांनी केला होता. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी चंद्रकांतदादांनी अजितदादांशी बोलून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
Rohit Pawar: ‘वयावरुन टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित दादांना रोहित पवारांनी सुनावलं
मात्र त्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास सदस्यांना न्यायालयात जाण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले होते. त्याचवेळी जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी एका वकिलामार्फतअजित पवार, जिल्हाधिकारी यांच्यासह दहा जणांना नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक वादळी होण्याची चिन्हे होती. मात्र त्यापूर्वीच अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपच्या प्रस्तावित कामांना तोंडी मान्यता दिली आहे. भाजप लोकप्रतिनिधी आणि सदस्यांनी दिलेल्या कामांच्या याद्या त्यांनी मान्य केल्या. याशिवाय शिवसेना सदस्यांनी त्यांची कामे सादर करावीत, असे निर्देशही दिले आहेत.