Nana Patole : पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये ही फडणवीसांची इच्छा…

Nana Patole : पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये ही फडणवीसांची इच्छा…

मुंबई : कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. मी त्यांना भेटून बोलू असे सांगितले पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कसबासाठी उमेदवार जाहीर केला होता. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होऊ नये असं कुणाला वाटतं? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे एकनाथ शिंदे यांचे काही चालत नाही का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. पटोले आज पुण्यात आले असता त्यांनी पत्रकार परिषदमध्ये कसबा उमेदवार कोण असेल याविषयी भूमिका मांडली.

पटोले म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात परंपरा राहिली पाहिजे म्हणून कसबा निवडणूक बिनविरोध करा, मी म्हटलं भेटून बोलू. मी भाजपने सोलापूर, अंधेरी, कोल्हापूर निवडणूकीत काय केलं हे बोलणार नाही, असं विधानं करत पटोले यांनी भाजपाच्या जुन्या खेळीबाबत आठवण करून दिली.

कसबामध्ये मुक्ता टिळक कुटुंबाने जी पक्षाची सेवा केली, त्याच भान ठेवत त्या कुटुंबाला उमेदवारी मिळाली पाहिजे होती. असं सांगत त्यांनी एकूणच मतदार संघातील सर्वाधिक ब्राम्हण समाजाला भावनांना हात घातला. उद्या पुण्यात होणाऱ्या आंदोलननंतर काँग्रेस आपला उमेदवार कसबा पोटनिवडणुकीसाठी जाहीर करणार आहे. तो टिळक कुटुंबातील असेल का? याकडेही लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राजकारणातील परंपरा सांगत पोटनिवडणुकीत विरोध न करता त्या बिनविरोध करण्यात याव्या असं मत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी आपण विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलणं केलं असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं.

अंधेरी पोटनिवडणुकीत जशी बिनविरोध झाली होती त्याचप्रमाणे निवडणूक देखील बिनविरोध व्हावी, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube