विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! तब्बल 150 मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश नाही
Ganesh Visarjan Miravnuk Pune पुण्यात निघणाऱ्या मुख्य विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी पोलिसांनी यंदा नियोजनात बदल केला आहे.
Ganesh Visarjan Miravnuk Pune Police denied entry to 150 mandals in main Miravnuk : गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर पुण्यात निघणाऱ्या मुख्य विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी पोलिसांनी यंदा नियोजनात बदल केला आहे. मागील दोन वर्षांत तात्पुरत्या परवानगीच्या आधारे मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या सुमारे १५० गणेश मंडळांना यंदा या मिरवणुकीत प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मनीषा जेऊरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल; निलेश यांच्यानंतर स्वाती चव्हाणलाही अटक
महापालिका आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी संबंधित मंडळांना पत्र पाठवून यंदाची परवानगी नाकारली आहे. मॉडेल कॉलनी संघर्ष मित्र मंडळालाही असे पत्र मिळाले आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळं पावसाची शक्यता; घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
मंडळाचे कार्याध्यक्ष अतुल वैद्य यांच्या माहितीनुसार, त्यांचे मंडळ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. यापूर्वी बालगंधर्व परिसरातील नदीपात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते. मात्र, सुमारे चार वर्षांपूर्वी आवश्यक परवानगी घेऊन मंडळाने कुमठेकर रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी मंडळाचा मिरवणुकीतील सहभाग कायम होता. मागील तीन ते चार वर्षांत शहराच्या विविध भागांतील सुमारे १५० मंडळांनाही अशाच प्रकारे मुख्य मिरवणूक मार्गावर येण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, यंदा या मंडळांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
चार प्रमुख रस्त्यांवरून होते मिरवणूक
पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवरून जाते. यापैकी लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे. मानाच्या पाच गणपतींना येथे पारंपरिक अग्रक्रम दिला जातो. त्यानंतर इतर गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात.
२०२२ मध्ये या चार मार्गांवरून ६०८ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. २०२३ मध्ये ही संख्या वाढून १ हजार १५ झाली. यंदा पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या ४ हजार १७० वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ३ हजार ९५९ होती. मंडळांची संख्या वाढत असल्याने मुख्य मिरवणुकीतील गर्दी, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेवरील दबावही वाढत आहे.
मिरवणुकीचा कालावधी कमी करण्याचे आव्हान
पुण्याची विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी नियोजन केले जाते. मात्र, प्रत्यक्षात मिरवणुकीचा कालावधी मोठा राहतो. २०२२ मध्ये मिरवणुकीला सुमारे ३१ तास लागले होते. २०२३ मध्ये ३० तास २५ मिनिटे, तर २०२४ मध्ये पोलिसांच्या नोंदीनुसार २८ तास ४५ मिनिटांत मिरवणूक पूर्ण झाली. २०२५ मध्ये मात्र कालावधी पुन्हा वाढला. पोलिसांच्या नोंदीनुसार मिरवणूक ३२ तास २६ मिनिटे चालली, तर अग्निशमन दलाच्या नोंदीनुसार अंतिम विसर्जन होईपर्यंत सुमारे ३४ तासांचा कालावधी लागला.
मंडळांकडून मार्गात होणारे थांबे, एकाच वेळी अनेक मंडळे मिरवणुकीत दाखल होणे, ढोल-ताशा पथकांची मोठी संख्या, ध्वनिवर्धकांवरील वेळेच्या निर्बंधामुळे मिरवणुकीचा वेग कमी होणे, तसेच मार्गावरील गर्दी आणि अडथळे या कारणांमुळे मिरवणुकीला अधिक वेळ लागत असल्याचे प्रशासनाच्या नियोजनातून समोर आले आहे.
दीर्घकाळ बंदोबस्तामुळे पोलिसांवरही ताण
मिरवणूक मध्यरात्रीनंतरही सुरू राहून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालत असल्याने पोलीस बंदोबस्ताचा कालावधी वाढतो. २०२५ मध्ये गणेशोत्सवासाठी पुणे शहरात सुमारे ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्य मिरवणूक मार्गावर गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, गणेश मंडळांना शिस्तबद्धपणे पुढे नेणे, महिला आणि नागरिकांची सुरक्षा तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते.
मिरवणुकीचा कालावधी वाढल्याचा परिणाम शहराच्या वाहतुकीवरही होतो. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यासह मध्यवर्ती भागातील अनेक मार्ग बराच काळ बंद ठेवावे लागतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाणारे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, रुग्णवाहिका आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही अडचणींचा सामना करावा लागतो.
गेल्या वर्षी मिरवणुकीनंतर मार्गांवर जमा झालेला कचरा हटवण्यासाठी पुणे महापालिकेला सुमारे २५० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली होती. त्यामुळे यंदा मुख्य मिरवणुकीतील सहभागी मंडळांची संख्या नियंत्रित करून कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हे नवे नियोजन केले आहे.