खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत वस्तू व सेवा कर दिन मोठ्या उत्साहात साजरा

Goods And Services Tax Day : 01 जुलै 2025 रोजी वस्तू व सेवा कर पुणे विभागाच्या वतीने 08 वा ‘ वस्तू व सेवा कर दिन (Goods And Services Tax Day) उमाकांत बिराजदार, अपर राज्यकर आयुक्त, पुणे (Pune) यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कला आणि सांस्कृतिक सभागृह ,येरवडा, पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अभिनेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पुणे परिक्षेत्र -2 चे अपर राज्यकर आयुक्त उमाकांत बिराजदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .वस्तू व सेवा कर विभागातील पुणे परिक्षेत्र एकचे अपर राज्यकर आयुक्त संजीव पाटील व सर्व राज्यकर सह आयुक्त कार्यक्रमास उपस्थित होते. मागील वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
वस्तू व सेवा कर दिनानिमित्त विभागाच्या वतीने विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच वस्तू व सेवा कर कायद्यावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमधील विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच मागील वर्षी नियमित कर भरणा करणाऱ्या करदात्यांचाही प्रतिनिधिक सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते वस्तू व सेवा कर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता उभारण्यात आलेल्या सुसज्ज अशा पाळणा घराचे व अद्ययावत अशा स्पोर्टस् क्लबचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य प्रस्ताविक राज्यकर सहआयुक्त सुनील काशिद पाटील यांनी केले.
आपल्या भाषणात बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी “आयुष्यात चांगली परिस्थिती असेल तर आपल्याकडून तर आपल्या वर्तनात अहंकार येऊ नये आणि वाईट परिस्थिती असेल ते तेव्हा आपण संघर्ष आणि हिम्मत सोडू नये. प्रशासन लोकाभिमुख असेल तर राष्ट्रनिर्मितीत त्याची भूमिका अत्यंत मोलाची ठरते” असे मत व्यक्त केले. अपर राज्यकर आयुक्त उमाकांत बिराजदार यांनी वस्तू व सेवा कर विभाग पुणे यांच्याद्वारे मागील वर्षी कर संकलन व इतर उपक्रमाबाबत केलेल्या कार्याची माहिती दिली.
भारतीय कर्णधार शुभमन गिलचा नवा कारनामा; मोडला किंग कोहलीचा ‘तो’ विक्रम
वस्तू व सेवा कर दिन सोहळ्याच्या दुपारच्या सत्रात जल्लोष 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांनी गायन ,वादन, नृत्य अशा अनेकविध कला सादर केल्या. या कार्यक्रमात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. सदर कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला वस्तू व सेवा कर भवन येरवडा पुणे येथे अतिशय मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.