…तर महाराष्ट्राचे चित्र पलटू शकते; डॉ. दीपक पवार यांचं प्रतिपादन, विवेकवसा फाउंडेशन तर्फे वाचक पुरस्काराचं वितरण

महिन्याला लाखो रुपये कमावणारा वर्ग एका पुस्तकासाठी दोनशे रुपये खर्च करायला तयार नाही.

News Photo   2026 04 27T185250.768

महाराष्ट्राची प्रगल्भ विचार परंपरा विसरून आपण बाहेरून आयात केलेल्या आक्रमक सांस्कृतिक (Pune) राजकारणाच्या आहारी गेलो आहोत. मात्र महाराष्ट्र हेच राष्ट्र आहे, या भावनेने आपल्या सगळ्या परंपरेचा विचार केला पाहिजे. सातवाहन काळापासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळापर्यंत विचार व्हावा. मात्र केवळ पूर्वगौरवात रमण्यासाठी नाही तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे दुसरे पान २०२६ नंतर उलटवणे शक्य आहे का ? हे पाहिले पाहिजे. असं प्रतिपादन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि ख्यातनाम वक्ते डॉ. दीपक पवार यांनी केले.

पुढे म्हणाले, पहिले पान उलटवले ते सगळे वाचणारे, विचार करणारे आणि चिकित्सक होते. यामध्ये एस एम जोशी, डांगे, अत्रे यांच्यापासून ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंतच्या लोकांचा समावेश होतो. या लोकांचा वारसा आपण चालवला तर महाराष्ट्राचे चित्र पलटू शकते असंही ते म्हणाले.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त विवेकवसा फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वाचन, मराठी आणि महाराष्ट्र’ या विषयावरील व्याख्यानात पवार बोलत होते. या वेळी फाउंडेशनतर्फे सुगावाकार प्रा. विलास वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा ‘वाचक पुरस्कार’ गंगाधर सत्त्वधर यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे संघटक विशाल विमल, दत्तात्रय संकपाळ उपस्थित होते.

एमजीएम विद्यापिठात; शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाटप करत आमदार गायकवाडांचा निषेध

सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला धावून गेले पाहिजे, या भावनेतून आपण बाहेर आले पाहिजे. हिमालय विस्कळीत झाला, त्याचे स्खलन झाले, तर त्याकडे उत्तराखंडचे लोक पाहतील. आपण पहिल्यांदा सह्याद्री खचतो की नाही हे पाहिले पाहिजे. दोन माफियांना सत्तेवरून घालवण्यासाठी पारंपारिक चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासाचे नव्याने वाचन केले पाहिजे. महाराष्ट्राला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची मोठी वैचारिक आणि वाद-विवादाची परंपरा आहे. मात्र ही परंपरा विसरून आपण ‘हिंदी-हिंदू-हिंदुस्थान’च्या नादाला लागलो आहोत, अशी टीका डॉ. दीपक पवार यांनी केली.

महिन्याला लाखो रुपये कमावणारा वर्ग एका पुस्तकासाठी दोनशे रुपये खर्च करायला तयार नाही. हा केवळ वैचारिक दुष्काळ नसून, चिंधीचोरी आहे. काम करण्याची क्षमता सर्व लोकांना मिळावी. वाचणाऱ्यांनी काम करावे, काम करणाऱ्यांनी वाचावे, विचार करावा आणि समाजात दुभंगलेपण राहिले असेल तर ते दूर करावे, असेही पवार म्हणाले. समाजाच्या अज्ञानाचे सार्वत्रिकीकरण हे ‘न्यू नॉर्मल’ होते, त्यामुळे भिडे वाड्यासमोर अथर्वशीर्षांचे पठण केले जाते आणि मार्गशीर्षात गुरुवारचे उपवास करणाऱ्या स्त्रिया तीन जानेवारीला स्वतःला ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणवून घेतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि भूमिका विशाल विमल यांनी व्यक्त केली. समाधान भगत यांनी गाणी सादर केली. शाम येणगे यांनी अभिवाचन केले. मानपत्र वाचन प्रतीक्षा वामन यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय क्रांती आरगडे यांनी करून दिला. श्रीकृष्ण ब्राह्मणकर यांनी कविता वाचन केले. प्रवीण खुंटे यांनी सूत्रसंचलन केले. सुधीर राऊत यांनी आभार व्यक्त केले.

पंधरा वर्षांपूर्वी आमची चूक

आमच्यासारख्या पुरोगामी कार्यकर्त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी मराठी अभ्यास केंद्राच्या बाजूने भूमिका घेतली असती तर आज मुंबईसह महाराष्ट्राचा गायपट्टा झाला नसता. त्यावेळी आम्ही संविधानातील कलम 15, 16 आणि 19 चा आधार घेऊन परप्रांतीयांच्या बाजूने कळवळ्याने उभे होतो, ही आमची चूक झाली. पुढे याच गायपट्ट्याने मराठी आणि महाराष्ट्रावर आक्रमण केले आहे, अशी खंत विशाल विमल यांनी व्यक्त केली.

follow us