kasba By Poll Result : रवींद्र धंगेकर विजयी; भाजपला धूळ चारली
kasba By Poll Result : कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 11 हजार 40 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
वाचा : Kasba By Poll Result : आनंद दवे, बिचुकलेंचा पत्ता साफ ?; दोघांपेक्षा मतदारांनी नोटाच दाबला
गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. सुरुवातीच्या मतमोजणीत फारशी आघाडी नव्हती. त्यानंतर आघाडी वाढत गेली. दहाव्या फेरीनंतर दोघांच्या मतातील फरक मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर धंगेकरांच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली. काही फेऱ्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र, ती काही काळापर्यंतच होती. शेवटच्या फेरीअखेर धंगेकरांना 72 हजार 599 मते मिळाली. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना 61 हजार 771 मते मिळाली.
ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री इतकेच काय तर स्वतः खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आजारी असतानाही प्रचारात उतरले होते. प्रचारातही तसा जोश दिसत होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही (MVA) जोरदार प्रचार केला. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. विजयी कोण होणार, याचीच चर्चा होती.
आता मात्र मतमोजणीतून हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकरांना 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार रासने यांचा पराभव केला. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार सातत्याने निवडून येत होता. यंदा मात्र काँग्रेसने ही परंपरा बदलून टाकली आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीने भाजपकडून हिसकावून घेतला आहे.