Kasba Bypoll : देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक यांच्या कानात काय सांगितलं?
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे.
त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये मागे राहण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा असून त्यांची समजूत काढण्यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रात्री उशिरा टिळक वाड्यात जाऊन त्यांची भेट घेतली.
मुक्ता टिळक यांची पती शैलेश आणि पुत्र कुणाल या दोघांपैकी कोणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र कसबा विधानसभेचे गणित पाहता भाजपचा काँग्रेसचे संभाव्य उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याशी सामना होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे टिळक कुटुंबाऐवजी इतर नावांचा विचार भाजपा पक्षश्रेष्ठी करत आहेत.
कुणाल टिळक यांची राज्य प्रवक्ते पदी नियुक्ती करून टिळकांना इतरत्र सामावून घेण्याचा विचार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आता शैलेश टिळक यांची समजूत काढून पक्ष देईल त्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती भाजपने त्यांनी केल्याची माहिती वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दिली आहे.