Kasba bypoll : बलाढ्य भाजपला कसबा पोटनिवडणूक बिनविरोध का हवीय? ‘ही’ आहेत कारणे

  • Written By: Published:
Kasba bypoll : बलाढ्य भाजपला कसबा पोटनिवडणूक बिनविरोध का हवीय? ‘ही’ आहेत कारणे
  • Team Letsupp (विष्णू सानप)

पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ, आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 26 तारखेला मतदान होणार असून दोन मार्चला निवडणूक निकाल येणार आहे.

दरम्यान, भाजपने या दोन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देखील जाहीर केले असून उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आले आहे. मात्र, अजूनही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा भाजप नेते करत आहेत. त्याचे कारणही अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीमध्ये विशेष करून कसब्यातील निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. याची कारणेही अनेक आहेत. यामध्ये एक कारण म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची तोंडावर आलेले निवडणूक असून या पोटनिवडणुकीत भाजपला जर पराभव पत्करावा लागला तर याचा परिणाम महापालिका निवडणूक होऊ शकतो याचीही भीती भाजपला सतावत आहे.

दुसरं म्हणजे शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीला भाजपचा हात होता हे काही लपून राहिले नाही. त्यामुळे शिवसेनेला (ठाकरे) अर्थात उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीचाही फटका भाजपला बसणार असल्याने भाजप थेट निवडणुकीचा सामना करण्याचे टाळत असल्याचे सातत्याने दिसत आहे. त्यामुळेच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत भाजपने चुरस कायम ठेवली आणि ऐनवेळी निकाल आपल्या बाजूने लागणार नाही, याचा अंदाज घेत चातुर्याने माघार घेतली होती. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.

याबरोबरच कसब्यामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी कुठला उमेदवार दिला तर धंगेकरांपुढे त्याचा टिकाव लागेल, असे सर्वे केल्याचे बोलले जाते. त्यामुळेच टिळक कुटुंबीयांचा पत्ता कट करून मोठे मंथन करून ऐनवेळी माजी नगरसेवक रासने यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे. मात्र तरीही या निवडणुकीत भाजप जिंकेल, असं ठामपणे भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून अद्यापही खासगीत बोलताना सांगितलं जात नाही. त्यामुळे भाजप नेत्यांची धाकधूक वाढली असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार बिनविरोधची भाषा केली जात आहे.

काल देवेंद्र फडणवीस यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पुन्हा इच्छा व्यक्त केली तर, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी बोलताना आम्ही टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देतो नाना पटोले यांनी आपल्या सहकारी पक्षांशी बोलून निवडणूक बिनविरोध करतील का?, असे थेट आवाहन केले आहे. तर राज ठाकरे यांनीही अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीप्रमाणे ही देखील पोटनिवडणूक महाविकास आघाडीने बिनविरोध करावी असे पत्राद्वारे आवाहन केले आहे. एकंदरीत भाजप नेत्यांचे आवाहन बघता कसब्यात भाजप आणि महाविकासाकडे मध्ये जोरदार टक्कर बघायला मिळणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

दरम्यान, मा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 2009 आणि 2014 या निवडणुकांमध्ये मनसे कडून लढत गिरीश बापट यांना घाम फोडला होता. 2009 ला तर त्यांचा अवघ्या आठ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी शिवसेना-भाजप युती असल्याने शिवसेना-भाजप सोबत होती तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढली होती. मात्र, आता तीनही पक्ष महाविकास आघाडीत असल्याने धंगेकर आपली व्यक्तिगत ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद मिळून भाजपला धक्का देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहे. म्हणूनच भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी वारंवार आवाहने केली जात असल्याचे बोललं जातं आहे. या झाल्या शक्यता मात्र काहीच दिवसांवर ही निवडणूक येऊन ठेपली असल्याने घोडा मैदान समोर आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube