Kasba Peth Bypoll : हिंदू महासभेचे आनंद दवे रिंगणात… हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट?
पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि कोथरुड (Kothrud) या दोन मतदार संघात ब्राह्मण (Brahmin) समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आधी कोथरुडमध्ये आणि आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला भाजपने (BJP) उमेदवारी नाकारली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्याने त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळायला हवी होती. त्यामुळे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदू महासंघाचे (Hindu Mahasabha) नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी कसबा पोटनिवडणूक (Kasba Peth Bypoll) लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामुळे आता भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी सकाळी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारल्याने ब्राह्मण समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आनंद दवे सोमवारी कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे कसब्यात हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुण्यातील कसबा विधानसभेचे यापूर्वी गिरीश बापट, तर त्यानंतर मुक्ता टिळक यांनी नेतृत्व केले. हा मतदारसंघ ब्राह्मण समाजातील उमेदवारांना साथ देणारा असल्याचे यापूर्वी देखील स्पष्ट झाले आहे. याबाबत हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले की, कसबा पोटनिवडणुकीत भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी आहे. तसेच भाजपकडून चिंचवडमध्ये एक न्याय तर कसब्यात दुसरा असे का, हा ब्राह्मण समाजावर अन्याय केल्याचा आरोपही यावेळी दवे यांनी केला.