Kasba Peth Bypoll हेमंत रासने १७ कोटींचे मालक… जमिनी घेण्याकडे जास्त कल!
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Bypoll) भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता १२ कोटी ४९ लाख ४५४ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ३५ हजार ९०० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे.
तसेच त्यांच्या पत्नी मृणाली रासने यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ६२ लाख २६ हजार ८५२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम २२ हजार २०० रुपये इतकी आणि १८ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १७ कोटी इतकी असून त्यांचा जमीन खरेदी करणे याकडे जास्त कल असल्याचे दिसत आहे.
त्याचबरोबर त्यांनी आपला मुलगा आणि मुलीच्या नावाने जवळपास एक कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
हेमंत रासने यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते स्वतः बांधकाम व्यवसायाचे काम करत असून तीन कंपन्यामध्ये भागीदार आहेत. तर त्यांच्या पत्नी या व्यवसाय तसेच शेती करत असल्याचे जाहीर केले आहे.
त्यांची विशेष करून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळच्या बोरघर, टाळसुरे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील पोंभुर्ले तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील म्हाळुंगे आणि भोर तालुक्यातील गोरड म्हशिवली येथे शेतजमीन आहे. हेमंत रासने आणि त्यांची पत्नी मृणाली रासने अशी दोघांच्या नावे २५ एकरहून अधिक जमीन आहे.
त्याचबरोबर पुणे शहरातील सदाशिव पेठ येथे दोन फ्लॅट बुधवार पेठ येथे एक फ्लॅट देखील आहे.
हेमंत रासने यांनी सोमवारी (दि. ६) रोजी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.
हेमंत रासने यांनी आपले वार्षिक उत्पन्न ५ लाख ७५ हजार ४१० रुपये रुपये तर पत्नी मृणाली ४ लाख ३० हजार ८३० रुपये इतके दाखवले आहे. तसेच हेमंत रासने यांच्याकडे एक इनोव्हा कार आणि एक दुचाकी वाहन आहे.