“अजितदादा तुमच्याच हातात चावी, आता बारामतीसाठी”… शरद पवारांसमोरच CM शिंदेंकडून कौतुक अन् आभारही…
CM Eknath Shinde Speech in Namo Maharojgar Melava in Baramati : बारामती शहराच्या विकासात शरद पवार यांच्याप्रमाणेच अजितदादांचंही मोठं योगदान आहे. बारामतीत पहिलं मॉडेल बसस्थानक होत आहे त्याबद्दल अजितदादांचे अभिनंदन, आधी रोजगार मेळावे झाले पण बारामतीतला हा मेळावा रेकॉर्ड तोडणारा आहे त्याबद्दलही अजितदादांचे आभार. अजितदादा तुम्ही आपल्या भाषणात म्हणालात बारामती विकासाच्या बाबतीत एक नंबर करू. पण आता तर तिजोरीची चावीच तुमच्या हातात आहे, तेव्हा बारामतीचा विकास करताना राज्य सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही याचा शब्द देतो, असे खास राजकीय संदेश देणारे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. कार्यक्रम होता नमो महारोजगार मेळावा स्थळ होते बारामती.
या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सर्वांसमोर एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या कामगिरीची यादी वाचत जोरदार बॅटिंग केली. शिंदे पुढे म्हणाले, आधी मेळावे अनेक ठिकाणी झाले. परंतु, येथील नियोजन रेकॉर्ड तोडणारं आहे. त्यामुळे अजितदादांचे आभार. बारामती शहराच्या विकासात शरद पवार आणि अजितदादांचं मोठं योगदान आहे. एखादा प्रकल्प हातात घेतला की अजितदादांचा कटाक्ष असतो की काम गुणवत्तेचं आणि वेळेत करा. आम्ही तसंच काम केलं आहे.
‘स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण…; कोल्हेंचा विखेंवर घणाघात
पोलीस कायम रस्त्यावर असतात. त्यांची घरं आणि कार्यालय उत्तम असली पाहिजेत. तशीच कामं बारामतीत केली आहेत. बारामतीत पहिलं मॉडेल बसस्थानक होत आहे त्याबद्दल अजितदादांचं अभिनंदन. सरकारच्या रोजगार मेळाव्याची खूप चर्चा झाली. पण आम्ही विकासात राजकारण आणत नाही. हे शरद पवार इथं असतानाच दिसत आहे. राज्यात 75 हजार नोकऱ्या दिल्या. आता पोलीस आणि शिक्षकांच्या भरती होत आहेत. मराठा आरक्षणाचा यात समावेश आहे. आज जवळपास रोजगार मेळाव्यातून 25 हजार मुलांना रोजगार मिळणार आहे.
शासन आपल्या दारी योजनेत लाभार्थ्यांना एका छताखाली योजनांचा लाभ दिला. 2 कोटी 7 लाख लोकांना लाभ दिला. सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना थेट नियुक्ती देणारे हे पहिलं सरकार असेल हे मी अभिमानाने सांगतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
‘मावळ’ ‘राष्ट्रवादी’कडे गेलं, तर काय करणार? बाळा भेगडेंच्या उत्तराने ‘इलेक्शन पिक्चर’ क्लिअर!
शरद पवार आणि बाळासाहेबांची चांगली मैत्री होती. बाळासाहेब नेहमी सांगायचे नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे हात तयार करा. सरकार तेही काम करत आहे. स्वयंरोजगार योजनांच्या माध्यमातून ते काम होणार आहे. सर्वसामान्यांना न्याय हाच सरकारचा अजेंडा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.