शरद पवारांचा आशीर्वाद, गेमचेंजर मुद्दे हातात; कलाटेंना ‘चिंचवड’मध्ये दिसतेय परिवर्तनाची लाट..
Chinchwad Elections 2024 : चिंचवड विधानसभा मतदारसंघात यंदा लढत चुरशीची दिसत आहे. भाजपाचा गड असलेल्या या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाने तगडा उमेदवार दिला आहे. राहुल कलाटे हे नाव या भागात सुपरिचित आहे. राजकारणात अनेक वर्षांपासून असलेल्या राहुल कलाटे यांना याआधीही निवडणुकीत नशीब आजमावलं आहे. लाखालाखांची मतं खेचली आहेत. मागील निवडणुकीत राहुल कलाटे अपक्ष लढले होते. पण आता महाविकास आघाडीची ताकद पाठीशी आहे.
शरद पवारांचा आशीर्वाद मिळालाय. इथल्या नागरिकांनाही आता बदल हवाय. मी लोकांसाठी लढणारा माणूस आहे. सत्ताधाऱ्यांचा विरोध असतानाही लोकांच्या हिताची काम भांडून पूर्ण केली. फायटिंग स्पिरिट आहे. त्यामुळे यंदा मतदारसंघात परिवर्तनाची लाट निश्चित येईल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.
लेट्सअप मराठीच्या विशेष कार्यक्रमात राहुल कलाटे यांनी मतदारसंघाचा लेखाजोखा मांडला. तसेच मतदारसंघात यंदा परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला. यंदा या मतदारसंघात परिवर्तन होईल असं वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना कलाटे म्हणाले, ‘परिवर्तन होणार हे आता पावलोपावली जाणवत आहे. या मतदारसंघातल्या जवळपास ७५ टक्के भागाचे खूप वर्षांपूर्वी पवार साहेब स्वतः खासदार होते. या मतदारसंघातील चिंचवड, रावेत, काळेवाडी, सौदागर, पिंपळे गुरव यातील साठ टक्के लोकसंख्येचे शरद पवार (Sharad Pawar) खासदार होते. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांचा पवार साहेबांप्रति असलेला जिव्हाळा मला पदोपदी जाणवतोय. पवार साहेबांच्या संकल्पनेतूनच हिंजवडी आयटी पार्क उदयास आलाय.’
ज्यावेळी पोटनिवडणूक झाली तेव्हा सहानुभूतीची लाट होती तीच परिस्थिती आता राहिल का? या प्रश्नावर कलाटे म्हणाले, ‘पोटनिवडणुकीवेळी सहानुभूती होती असं मला आजही वाटत नाही. त्यावर आज मी जास्त बोलणार नाही. त्यावेळेस जे काही झालं ते महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांच्यात आणि माझ्यात निवडणूक व्हावी असं अपेक्षित होतं. आज पवार साहेबांच्या आशीर्वादानं तसं होताना दिसत आहे.’
या मतदारसंघात असा कोणता मुद्दा आहे जो गेमचेंजर ठरू शकतो? असे विचारल्यावर, ‘लोकांना आता बदल हवा आहे. मागील वीस वर्षांपासून एकाच लोकप्रतिनिधीची सत्ता येथे आहे. स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार होत्या. आता निवडणुकीत त्यांचे बंधू शंकर जगताप उभे आहेत. भाजपात बदल होईल असं लोकांनाही वाटत होतं. आम्हाला जगताप परिवार नको म्हणून नगरसेवकांनी मोठा विरोधही केला होता. जमिनी पातळीवर त्यांचं यश नाही. 2005 मध्ये ज्या अडचणी होत्या त्या आजही आहेत. एकही समस्या सुटलेली नाही’, असे राहुल कलाटे म्हणाले.
हा मतदारसंघ भाजपला मानणारा असल्याचे बोललं जातं खरंच अशी परिस्थिती आहे का? असे विचारले असता कलाटे म्हणाले, ‘मागील निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना दीड लाख मतं मिळाली होती. मला 1 लाख 12 हजार मतं मिळाली. आमच्यात फक्त 38 हजार मतांचा फरक होता. त्यावेळेस मी अपक्ष लढलो होतो. आणि जगताप भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार होते. आज तर शिवसेना पवार साहेबांबरोबर आहे. आकडेवारीतही फार फरक नाही.’
‘2014 मध्ये वेगळ्या प्रकारची लाट देशात होती. 2019 मध्ये ती लाट जास्त वाढली होती. तरीही जगताप आणि माझ्यात अटीतटीची लढाई झाली. त्यावेळी तर माझ्याकडे चिन्ह देखील नव्हतं पण आज मात्र महाविकास आघाडीची ताकद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात परिवर्तनाची लाट निश्चित येणार आहे’, असा ठाम विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.
भाजपनं विरोध केला तर थेट सरकारकडूनच मंजुरी
‘या भागात अनेक समस्या आजही आहेत. या भागात डीपी रोडची कामं मी मोठ्या प्रमाणात काढली होती. पण सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीत ही कामं रिजेक्ट केली. मतदान घेऊन ही कामं रिजेक्ट करण्यात आली. भाजपाच्या नगरसेवकांनी विरोधात मतदान केलं. ती कामं काय एकट्या राहुल कलाटे यांची होती काय? माझ्या जागी दुसरा कुणी असता तर कदाचित शांत राहून घरी बसला असता. पण मी तसं केलं नाही. मी राज्य सरकारकडे अपील केलं. त्या कामांना मंजुरी घेतली आणि आज ही कामं पूर्ण झाली आहेत.’