बारामतीत भाऊ विरुद्ध बहीण? अजितदादाही भरणार अर्ज; ‘डमी’ उमेदवाराचं गणित काय?
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत (Baramati Lok Sabha Election 2024) ठरली आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दोन्हींपैकी कोणत्या उमेदवाराला निवडून देणार याचं उत्तर निकालानंतरच मिळेल. परंतु, या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होणार की काय अशी शक्यताही दिसू लागली आहे. यामागे कारणही आहे. अजित पवार यांच्याही नावाने उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता हे नेमकं कसं असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
बारामती मतदारसंघातील निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार येत्या 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणूक अधिकारी कार्यालयातून अर्जही नेले आहेत. याचबरोबर अजित पवार यांच्या नावानेही अर्ज नेले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता अजित पवार बारामतीत डमी उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऐनवेळी काही गडबड होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
इंडिया आघाडी कुणी दिल्लीकडे कुणी बारामतीकडे खेचतय, ती विना डब्ब्यांची ट्रेन; फडणवीसांचा टोला
सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणांनी बाद झाला तर उमेदवारीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशावेळी पर्याय पाहिजे. त्यामुळेच अजित पवार यांच्या नावाचा एक अर्ज भरण्यात येणार आहे. या माध्यमातून तयारी महायुतीने केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची चर्चा देशभरात आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबातील सदस्यांत ही लढत होत आहे. सुनेत्रा पवारांनी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं आहे. अशा परिस्थितीत उमेदवारीवरून काही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
सुनेचा हक्क नाकारणारे, बारामतीच्या लेकीचे अगतिक बाबा; बाहेरुन आलेल्या पवार वादात शेलारांची टीका
डमी उमेदवार म्हणजे काय ?
महत्वाच्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना राजकीय पक्ष खबरदारी म्हणून डमी उमेदवारी अर्ज भरून ठेवतात. जर काही कारणांमुळे प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर ऐनवेळी फजिती नको म्हणून हा पर्याय निवडला जातो. प्रतिष्ठेच्या मतदारसंघातील लढतींवेळी हा पर्याय वापरला जातो असा अनुभव आहे. परंतु डमी उमेदवार देतानाही तो तितक्याच ताकदीचा आणि निवडून येणारा असला पाहिजे याचीही काळजी पक्षांकडून घेतली जात आहे. यावेळी बारामती मतदारसंघात असाच प्रकार दिसून येत आहे.