“खासदार साहेब पाच वर्ष कुठं होता?” मतदारांचा सवाल; शिरुरमध्ये रंगलय बॅनर पॉलिटिक्स!
Shirur Lok Sabha : पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघांची जास्त चर्चा (Shirur Lok Sabha) होत आहे. बारामतती नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. तर शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने (Amol Kolhe) आहेत. त्यामुळे ही लढतही अटीतटीची होणार आहे. शिरुर मतदारसंघात स्वतः अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे. त्यानंतर आता येथे असा एक प्रकार घडला आहे ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आंबेगाव तालुक्यात एक बॅनर लागला आहे. विद्यमान खासदार साहेब तुम्ही पाच वर्ष कुठं होता? असा सवाल या बॅनरमधून मतदारांनी विचारला आहे.
Amol Kolhe : ‘बात निकली है तो दूर तक जाएगी’ कोल्हेंनीही अजितदादांना घेरलंच
शिरुर मतदारसंघात महायुतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जागावाटपात या जागेवर अजित पवार यांनी दावा केला होता. त्यामुळे आढळराव पाटील यांचा पक्षात प्रवेश घडवून आणला गेला. कारण अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजितदादांकडे तगडा उमेदवार नव्हता. अशा परिस्थितीत आढळराव पाटील यांचच नाव समोर होतं. परंतु, आढळराव पाटील शिंदे गटात होते. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता येथे अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे.
यानंतर दोघांनीही मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. आंबेगाव तालुक्यातील निनावी बॅनरची चांगलीच चर्चा होत आहे. या बॅनरमध्ये खासदार अमोल कोल्हे यांना काही टोचणारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठं होता ? कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीत तुम्ही मतदारसंघात का नव्हता ? पाच वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा मिळाला ? असे तीन सवाल या बॅनरद्वारे विचारण्यात आले आहेत. आता या प्रश्नांवर अमोल कोल्हे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
..तर माझं बी नाव दिलीप मोहिते पाटील; भर सभेत आढळरावांना भरला दम
मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांना 5 लाख 77 हजार 347 मते मिळाली होती. तर अमोल कोल्हेंना 6 लाख 35 हजार 830 मते मिळाली होती. या निवडणुकीत अमोल कोल्हेंनी जवळपास 58 हजार 483 मतांची आघाडी घेत आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. यानंतर आता पुन्हा या दोन्ही आजी माजी खासदारांत लढत होणार आहे.