Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करणाऱ्यांना चपराक!

Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करणाऱ्यांना चपराक!

पुणे : काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. मात्र, त्यांचा हेतू साध्य झाला नाही. आम्ही यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) स्वायत्त आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) सन २०२३ च्या ऐवजी २०२५ पासून लागू करावा, अशी विनंती आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली होती. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सन २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचे मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाबद्दल माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हटले की, टिळक कुटुंबाला भेटायला कोणतेही कारण लागत नाही. कसबा पेठ पोटनिवडणुकीनिमित्त भाजपचे उमदेवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मी आलो होतो. त्यानंतर टिळक कुटुंबियांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो.

एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. तसेच तो सन २०२३ पासून लागू करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, नवीन अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. म्हणून हा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अशी या विद्यार्थ्यांची प्रामुख्याने मागणी होती. तसे विद्यार्थ्यांनी आयोगाच्या अध्यक्ष, मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले होते. मात्र, अयोग आपल्या भूमिकेवर ठाम होते. अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. त्याची आम्ही दखल घेऊन काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून लोकसेवा आयोगाला पाठवला होता. आयोगानेही सकारात्मक भूमिका घेत आज हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या लाखों विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

तर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. एमपीएससीने आता नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, एमपीएससी विद्यार्थ्यांची जी न्याय्य मागणी होती ती आज मान्य झाली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि आमच्या युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांचे मी त्यासाठी अभिनंदन करतो. समजूतदारपणे सरकार आणि एमपीएससीने ही परिस्थिती हाताळली असती तर चार दिवस युवकांना रस्त्यावर संघर्ष करावा लागला नसता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आम्ही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी करत होताे. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी आभार मानले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube