मोठी बातमी : ‘फायरब्रॅंड’ नेते वसंत मोरेंचा राजीनामा; साहेब माफ करा म्हणत मनसेला ‘जय महाराष्ट्र’

  • Written By: Published:
मोठी बातमी : ‘फायरब्रॅंड’ नेते वसंत मोरेंचा राजीनामा; साहेब माफ करा म्हणत मनसेला ‘जय महाराष्ट्र’

पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मोठा निर्णय घेत मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियावर राजीनामा पत्र पोस्ट करत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुकवर मोरे यांनी काही फोटो आणि पत्र पोस्ट केले आहेत. ज्यात त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत ‘साहेब माफ करा’ असा उल्लेख केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने राज ठाकरेंसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. मोरे यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्देशून एक पत्र देखील लिहिले आहे. ज्यात त्यांनी अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याची खंत व्यक्त केली आहे. (MNS Leader Vasant More Left Party Before LokSabha Election)

वसंत मोरेंच्या पत्रात नेमकं काय? 

मनसे राज ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात वसंत मोरे यांनी लिहिले आहे की,

प्रति,
मा. श्री राजसाहेब ठाकरे,
संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
विषय: माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.

भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद..!
आपला विश्वासू,
वसंत (तात्या) मोरे कात्रज पुणे.

‘आता ना तक्रार, ना कुणाकडून अपेक्षा’

वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी मध्यरात्री फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी ‘आता ना तक्रार, ना कुणाकडून अपेक्षा’ असे म्हणत एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. आता आपली कुणाकडून काहीही अपेक्षा नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. मोरेंच्या या पोस्टनंर ते नाराज असल्याचे जाहीर झाले होते. त्यानंतर अखर आता वसंत मोरेंनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

 

राज ठाकरेंना बोलून दाखवली होती मनातली इच्छा

मोरे पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी याआधीही स्पष्टपणे तसे सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या मेळाव्यातही त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. आपल्यालाच तिकीट मिळेल याबद्दल ते आश्वस्तही दिसत होते. परंतु, या तिकीटाच्या स्पर्धेत शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचीही एन्ट्री झाल्याने चित्रच बदलले.

पवारांची साथ की अन्य पक्षात प्रवेश

वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार (Sahrad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriye Sule) यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुण्यातील एका मैदानाच्या प्रश्नासाठी पवार साहेबांची भेट घेतल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर आता मोरेंनी मनसेला रामराम केला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांना साथ देणार की अन्य पक्षात प्रवेश करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज