Murlidhar Mohol : कसलेला पैलवान, महापौर अन् आता खासदारकीचा उमेदवार…
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून भाजकडून पुण्यात लोकसभेसाठी कुणाला संधी दिली जाणार याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज (दि.13) भाजकडून राज्यातील 20 जणांना संधी देण्यात आली असून, पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहोळ यांचा एकूणच प्रवास एक कसलेला पैलवान, महापौर असा राहिला आहे. त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता याबद्दल घेतलेला हा थोडक्यात आढावा. (Murlidhar Mohol Political Journey)
मोठी बातमी : भाजपची दुसरी यादी जाहीर; पुण्यातून मोहोळ, नगरमधून सुजय विखे मैदानात
कुस्तीसाठी गाठले कोल्हापूर
मुळशी तालुक्यातील मुठा गावातील किसनराव मोहोळ यांचे कुटुंब नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी साधारणपणे 1985 च्या सुमाराला पुण्यातील कोथरुडमध्ये आले. मोहोळ यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण भावे स्कूलमधून घेतले. पुण्यात झाले आहे. त्यानंतर त्यांनी कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापूरच्या मातीत कसलेल्या मोहोळ यांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाला तो 1993 च्या सुमाराला. नगरसेवकाच्या एकाच टर्ममध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौरपद अशी दोन्ही महत्त्वाची पदे सांभाळणारे ते अलीकडच्या काळातील पहिलेच नेते ठरले. शिवाजी विद्यापीठात शिकत असतानाच मोहोळ कसबा बावड्यातील शासकीय कुस्ती केंद्राच्या आखाड्यात उतरले. याच काळात त्यांनी आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरच्या आखाड्यापर्यंत मजल मारली.
मोदी-शाहांकडून अनेक दिग्गजांना धक्का; शेट्टी, कोटक, प्रीतम मुंडेंचा पत्ता कट
स्वतःच्या कामाची पाडली छाप
मोहोळ यांनी माजी खासदार अनिल शिरोळे यांच्यासह काही नेत्यांच्या संपर्कात आले. राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर मोहोळ यांनी सर्वप्रथम वॉर्ड पातळीवर संघटनेचे काम सुरू केले. त्यानंतर त्यांच्याकडे तेव्हाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर मोहोळ यांनी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, शहर भाजपमध्ये सरचिटणीस आदी पदे भूषवताना स्वतःच्या कामाची वेगळी छाप जनसामन्यांसह नेत्यांमध्ये निर्माण केली.
‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर!
2002 मध्ये महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्यपद त्यांच्या पदरात पडले. त्यानंतर वर्षेभरात म्हणजे, 2007 मधील महापालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीत ते पुन्हा याच भागातून नगरसेवक झाले.मोहोळांचे वाढते प्रस्थ पाहाता भाजपने त्यांना 2009 मध्ये खडकवासल्यातून विधानसभा निवडणूक लढण्याचा आदेश देण्यात आले. मात्र, मोहोळ यांना मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्याविरोधात पराभवाला सामोरे जावे लागले.
महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मोहोळ तिसऱ्यांदा नगरसेवक झाले.
पुणे महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आल्यानंतर मोहोळांच्या गळ्यात स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ पडली. याच काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपमधील बड्या नेत्यांची मने जिंकली. त्यानंतर त्यांना पुण्याच्या महापौर पदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर त्यांन पक्षाकडून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाचा पुण्याला मोठा फटका बसला होता. याकाळातच मुरलीधर मोहोळ पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी संभाळत होते. एकीकडे नागरिक भीतीच्या छायेत असताना मोहोळ यांनी पक्षाच्या मदतीने लाखो पुणेकरांना मदत पोहचवण्याचे काम केले होते.
उमेदवारी मिळताच मोहोळ यांनी सांगितले पक्षाचे वैशिष्ट्य
भाजपकडून आगामी लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हेच माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीची मी विनम्रपणे स्वीकारतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवू हा सार्थ विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने गेल्या दहा वर्षात पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही विकासाची गंगा पुढे नेत पुणे शहराला जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख निर्माण करायची असल्याचेही मोहोळ म्हणाले. याबरोबर शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी पुन्हा एकदा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. पी. आय. चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि महायुतीच्या नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करीन असा शब्ददेखील मोहोळ यांनी यावेळी दिला आहे.