Poona Merchants Chamber प्रशासनाची ‘ही’ कारवाई… बंद करण्याची ‘का’ होतेय मागणी!
पुणे : अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्या खालील नियम व नियमन २०११ ची दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद नेहमीच पूर्तता करत आले आहेत. परंतु, अन्न सुरक्षा व मानदे परवाना व नोंदणी नियमन २०११ अंतर्गत परवाना अट क्र. १४ ही अवाजवी आहे. तिचे पालन करणे सर्वच व्यापारी वर्गास त्रासदायक होत आहे. तर अन्न पदार्थ विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जात असल्याने पुण्यातील व्यापारी त्रस्त झाले आहेत. या व्यापाऱ्यांनी (Merchant) अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्तांकडे तक्रार केली आहे, असे दि पूना मर्चंटस् चेंबरचे सचिव रायकुमार नहार (Raikumar Nahar) यांनी सांगितले.
रायकुमार नहार म्हणाले की, या अटीनुसार खरेदी करणारा तसेच विक्री करणारा या दोघांकडे परवाना असणे बंधनकारक आहे. परंतु, परवानाधारक विक्रेत्याकडून नजर चुकीने परवाना नसलेल्या अथवा परवान्याची मुदत संपलेल्या खरेदीदारास अन्न पदार्थ विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. या व्यापाऱ्यांचा परवाना/नोंदणीची (FOSCOS) प्रणालीत मुदतीबाबत शहानिशा केली असता परवाना/नोंदणी (Active) किंवा (Inactive) ऐवढीच माहिती मिळते व त्याची मुदत कधीपर्यंत आहे याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस विक्री करताना सदरची माहिती घेणे शक्य नाही. सदरबाबत प्रशासनास FOSCOS प्रणालीत योग्य ते बदल करण्यास कळविले असून अद्यापर्यंत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
अन्न, सुरक्षा व मानदे कायदा २००६ मध्ये अन्न व्यावसायिकांकडून कायद्यातील तरतुदीचे पालन होत नसल्यास त्यांच्या विरुध्द कोणतीही कारवाई न घेता कलम ३२ नुसार सुधारणा नोटीस देऊन अन्न व्यावसायिकांना सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी स्पष्ट तरतुद नमूद केलेली आहे. परंतु, प्रशासनाकडून परवाना अट क्र. १४ बाबत अन्न व्यावसायिकांवर मोठमोठ्या रक्कमेच्या दंडाची कारवाई केली जात आहे. तरी परवाना अट क्र. १४ नुसार अन्न व्यावसायिकांविरुध्द दाखल होत असलेली कारवाई थांबविण्याबाबत आदेश द्यावेत, अशा आशयाचे निवेदन अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांना दिले आहे, असे रायकुमार नहार यांनी सांगितले.