अजितदादांची मोठी घोषणा; पण पाठ वळताच सचिव म्हणाले ‘त्याची गरजच नाही’

अजितदादांची मोठी घोषणा; पण पाठ वळताच सचिव म्हणाले ‘त्याची गरजच नाही’

पुणे : ससून रुग्णालयाशेजारी नवीन, सुसज्ज आणि अद्ययावत असे स्वतंत्र कर्करोग (Cancer Hospital) रुग्णालय उभारण्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) काल (शुक्रवारी) केली. शिवाय रुग्णालयासाठी ससूनशेजारील जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची जाहीर सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना केली. मात्र, अजितदादांची पाठ वळताच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी या रुग्णालयाची गरजच नाही, असे म्हणत या प्रस्तावावर फुली मारली. त्यामुळे अधिकारी लोकप्रतिनिधींचा आणि त्यातही उपमुख्यमंत्र्यांचाही एखादा प्रस्ताव कसा हाणून पाडतात याचा जाहीर अनुभवच जनतेला पाहायला मिळाला.

नेमके काय घडले?

काल ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर बोलताना अजितदादांनी ससून रुग्णालयाशेजारी नवीन, सुसज्ज आणि अद्ययावत असे स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणा केली. या रुग्णालयासाठी ससूनशेजारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा आहे, ती जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी, अशी सुचनाही मुश्रीफ यांना केली. या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा एमएसआरडीसीला देण्यात येईल. या सगळ्यात जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनीही लक्ष घालावे, अशा सुचना अजितदादांनी केल्या.

‘दिल्लीश्वरांनी डोळे वटारले की ते घाबरतात’ सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका

याच कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी सध्या तरी स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची आवश्यकता नाही, असे म्हणत अवघ्या काही मिनिटांमध्ये या प्रस्तावावर फुली मारली. ते म्हणाले की, सध्या ससूनमध्ये कर्करुग्णांवर केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. केवळ रेडिओथेरपीचा प्रश्न आहे. त्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची गरज नाही. ससूनमध्येच ही सुविधा उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील. ससूनमध्ये यासाठी पुरेशी जागा आहे, असेही त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube