पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप करंडक’ : साई पॉवर हिटर्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी पटकावली ट्रॉफी
पुणे : पुनित बालन ग्रुपतर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाला पराभूत करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर नाव कोरले. सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई पॉवर हिटर्सच्या हुमेद खान याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा 37 धावांनी पराभव केला. यावेळी पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन (Punit Balan) यांच्यावतीने पुणे पोलीस कल्याण निधीला 5 लाखांची देणगीदेखील देण्यात आली. (Punit Balan Group Friendship Trophy Final Match Update)
‘पुनीत बालन ग्रुप’कडून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ३१ संगणकांची भेट
विजयासाठी 92 धावांचे लक्ष्य
पहिल्यांदा फलंदाजी करताना साई पॉवर हिटर्सने 92 धावांचे लक्ष्य उभे केले. 4 गडी बाद 31 धावा असा संघ अडचणीत सापडलेला असताना संघाच्या हुमेद खान याने 45 धावांची दमदार खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याला कर्णधार श्रीधर मोहोळ याने 25 धावा करून उत्तम साथ दिली. या दोघांनी 33 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. त्यानंतर विजयासाठी 92 धावांचे लक्ष्य भेदण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा डाव अवघ्या 55 धावांवर आटोपला. साई संघाच्या हुमेद खानने 11 धावात 4 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
पुनीत बालन यांच्या कार्याची लष्कराने घेतली दखल, मध्य कमांडने प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले
विजयी संघाचा गौरव
यावेळी विजेत्या ठरलेल्या साई पॉवर हिटर्स संघाला 2 लाख 11 हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाला 1 लाख 11 हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या रूपक तुबाजी याला 51 हजार रूपये आणि इलेट्रिकल बाईक देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज- कपिल राऊत, सर्वोत्कृष्ट गोलंदाज- हुमेद खान, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक- आदित्य अष्टपुत्रे, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- प्रथमेश गोवकर या सर्व खेळाडूंना प्रत्येकी 21 हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. फेअर प्ले पुरस्कार तुळशीबाग टस्कर्स आणि मिडीया मास्टर्स या दोन संघांना देण्यात आला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) श्री. अमिताभ गुप्ता, प्रसिध्द सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, माजी आमदार जगदीश मुळीक, दिक्षीत मोटर्सचे श्रेयस दिक्षीत, मोहनदादा जोशी, पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, नितीन पंडीत, कुमार रेणूसे, योेगेश शांडिल्य, गगनदीप ओबोरॉय, शिरीष मोहीते, अनिल सपकाळ, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदी उपस्थित होते.