रोहित पवार म्हणाले…तेव्हा अजित पवारांना 440 व्होल्टचा झटका बसणारच
पुणे : कसबा (Kasba) व चिंचवड (Chinchwad) निवडणुकीच्या विजयाचा दावा करत सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहे. नुकतेच अजित पवारांना (Ajit Pawar) 440 व्होल्टचा झटका देऊ, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं होतं, त्यांच्या या वक्तव्याला आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) प्रत्युत्तर दिलं आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला की अजित पवार यांना सुखद धक्का हा बसणार आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी बावनकुळेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
कसबा – चिंचवड निवडणुकांच्या प्रचारासाठी आता नेतेमंडळी मैदानात उतरले आहे. यातच महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पिंपरीमध्ये आले आहे. यावेळी त्यांनी काटे यांना निवडून द्यावे असे आवाहन मतदारांना केले आहे. यावेळी बावनकुळे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते बावनकुळे?
चिंचवडमध्ये प्रचारादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोधसाठी राष्ट्रवादीला विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. त्यामुळं मतदानाच्या दिवशी कमळासमोरच इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की असा 440 व्होल्टचा करंट अजित पवारांना लागला पाहिजे, असे ते म्हणाले.
Rohit Pawar : चिंचवड निवडणूक ही केवळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होणार
यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार एवढ्या मताधिक्याने निवडून येईल की याचा सुखद धक्का हा अजित पवार यांना बसेल. प्रश्न तेव्हा निर्माण होईल की निवडणुकीतील पराभवाचा दुःखद धक्का भाजपाला बसेल अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.