कष्टकऱ्यांचा आधार बाबा आढाव पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार
डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील पुना रुग्णालयात 10 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होते.
सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी (Pune) समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचं कालं सोमवारी (08 डिसेंबर) रोजी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पार्थिवावर आज (09 डिसेंबर)रोजी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहताना अजित पवार म्हणाले, आजचा प्रसंग कोणाच्या बाबतीत घडू नये, पण काळाच्या ओघात एखादा मनुष्य आपल्यातून जात असतो. वंचित आणि उपेक्षित लोकांसाठी बाबांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कामगार संघटना या माध्यमातून त्यांनी सातत्याने काम केलं. फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा त्यांनी नेहमी अंमलात आणली. संघर्ष योद्ध्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर काम केलं आहे. राज्यातील 13 कोटी जनतेच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Dr. Baba Adhav : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील पुना रुग्णालयात 10 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होते. हृदयाशी संबंधित समस्येमुळे बाबा आढाव यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. बाबा आढाव यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः रुग्णालयात त्यांच्या भेटीसाठी पोहचले होते. यावेळी शरद पवार यांनी वैद्यकीय पथकाकडून बाबा आढाव यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतली होती.
बाबा आढाव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्यविधीसाठी शैला आढाव, असीम आढाव, अंबर आढाव, माजी आमदार उल्हास पवार, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, अंकुश काकडे, सुषमा अंधारे, डॉ. अभिजीत वैद्य, बी. जी. कोळसे पाटील आणि नितीन पवार उपस्थित होते. दरम्यान, नितीन पवार यांनी माहिती दिली की, 12 डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी चार वाजता बाबा आढाव यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.
बाबा आढाव कोण आहेत?
1970 मध्ये बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. 95 वर्षीय असलेले बाबा आढाव तत्कालीन समाजवादी पक्षाचे होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून त्यांनी काम केले आहे. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाच्या माहिमेचे प्रणेते बाबा आढाव आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माथाडी कामगार नेते, सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे, सत्यशोधक म्हणून त्यांची ओळख आहे.
