निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर, बाबा आढाव यांचा आरोप, ईव्हीएम बाबतही शंका…

  • Written By: Published:
निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर, बाबा आढाव यांचा आरोप, ईव्हीएम बाबतही शंका…

Baba Adhav : विधानसभा निवडणुकी (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) 200 हून अधिक जागा मिळाल्या. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालाबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. अशातच आता ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांनी याबाबत आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं. विधानसभा निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप आढाव यांनी केला.

निवडणुकीत पैशाचा गैरवापर…
लेट्सअप मराठीशी बाबा आढाव यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 1952 पासून आजपर्यंत देशातील आणि राज्यातील प्रत्येक निवडणूकीचा मी साक्षीदार आहे. मात्र या निवडणुकीत जेवढा पैशाचा वापर झाला, तेवढा कधी झाला नाही. लाडकी बहीण योजना सारख्या पैसे वाटप करण्याच्या योजना आणल्या. त्यामुळे लोकांनी महायुतीला निवडून दिलं. सरकार ज्या मोफत देण्याच्या योजना सुरू करत आहेत, त्या हिताच्या नाहीत. काँग्रेसनेही लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणून दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा केली, ती बाब देखील हिताची नसल्याचं बाबा आढाव म्हणाले.

पुढं ते म्हणाले, लोकसभा आणि नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल इतके वेगळे कसे लागतात ? असा सवाल करत राज्यात ईव्हीएम घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं लोकशाही वाचवणे महत्त्वाचे असून नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचं असल्याचं आढाव म्हणाले.

सरकार माथाडी कामगारांचा कायदा गुंडाळतय…
निवडणूक होऊनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होत नाही, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. देशात लोकशाही संपुष्टात येऊ लागली आहे. लोकांचे हक्क रोज हिरावले जात आहेत. माथाडी कामगारांचा कायदा फडणवीस गुंडाळायला बसलेत, असं आढाव म्हणाले.

एकीकडे काँग्रेस उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. मात्र त्यांचे काही सहकारी अदानी यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी माझं आंदोलन सुरू आहे. अदानींवर कारवाई व्हायला हवी. अदांनीच्या विरोधात सदनात बोलूही दिलं जात नाही, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube