Video : तुम्ही घाबरू नका, मी सगळी व्यवस्था करतो; रूपाली ठोंबरेंना अजितदादांचा फोन

पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेत महाराष्ट्रातील 6 पर्यटकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर अनंतनाग येथील रूग्णालयात उपचार केले जात आहेत. तर, दुसरीकडे पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यादेखील पहलगाममध्ये असून, त्यांच्याशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) फोनवर संवाद साधला आहे. यात अजित पवार ठोंबरे यांना माझं ओमर अब्दुल्ला आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलणं झालं आहे मी सगळी व्यवस्था करतो तुम्ही घाबरू नका असे सांगताना दिसून येत आहेत. (Ajit Pawar Phone Call To Rupali Patil Thombre)
अजित पवार फोनवर काय म्हणाले?
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला झाला आहे, यामध्ये राज्यातील एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान रूपाली ठोंबरे देखील जम्मू काश्मीरमध्ये आहेत. ठोंबरे यांच्याकडून व्हिडिओ जारी करत येथे अडकलेल्या पर्यटकांसाठी सोय करण्याचे आवाहन केले आहे. अशातच अजितदादांनी ठोंबर यांच्याशी संपर्क साधला आहे. यावेळी पवारांनी माझं ओमर अब्दुल्ला आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलणं झालं आहे. मी सगळी व्यवस्था करतो तुम्ही घाबरू नका असा धीर दिला आहे.
आपले बरेच पर्यटक तिथे अडकले आहेत. त्या सर्वांना सुखरूप परत आणण्यासाठी अतिरिक्त विमान सोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. काही विमानं आम्ही हैदराबादला नेतोय असे म्हणत अमित शाह तिथे जाऊन बसले आहे. तसेच मोदी साहेब काल रात्री आले आहेत. एकूण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. पण जे घडलंय ते घडलंय. परंतु, तुम्हाला सर्वांना सुरक्षितपणे घरी आणलं जाईल असे सांगत मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्व जण संपर्कात आहोत.
विशेष विमानानं पुण्यातील पर्यटकांना आणणार; हेल्पलाईन नंबर जारी करत मोहोळांनी काय सांगितलं
प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे हीच प्राथमिकता
प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत, अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातवाईकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संपर्क साधून विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद व सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव घेणाऱ्यांचे रेखाचित्र जारी
या संपूर्ण प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः लक्ष ठेवून असून, राज्य व केंद्र सरकारी संबंधित यंत्रणांशी ते सातत्याने संपर्कात आहेत. राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेवर ठेवले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी सुध्दा उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना मदतीसह धीर दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील नागरीकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
राज्य शासनाने नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधून त्यांना वस्तुनिष्ठ व वेळोवेळी माहिती पुरवली जात आहे. पर्यटकांची यादी, त्यांच्या वास्तव्याच्या जागा आणि परतीच्या संभाव्य वेळापत्रकाची माहिती संकलित केली जात असून, ही संपूर्ण कार्यवाही समन्वयाने आणि जलदगतीने पार पाडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या आहेत.
श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना अजित पवारांचा फोन #Pahalgam #PahalgamTerroristAttack @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @Rupalispeak pic.twitter.com/UihnmpUj5E
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 23, 2025