नगरकरांचा दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड्‌स मॅरेथॉन’ मध्ये डंका ! चौघांचा रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलकडून सन्मान

  • Written By: Published:
नगरकरांचा दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड्‌स मॅरेथॉन’ मध्ये डंका ! चौघांचा रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलकडून सन्मान

नगर : दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली जाणारी जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी अल्ट्रा मॅरेथॉन रेस म्हणून ओळखली जाणारी ‘कॉम्रेड्‌स मॅरेथॉन’ ही स्‍पर्धा अवघ्‍या बारा तासांत पूर्ण करण्‍याचा मान नगरचे जगदीप माकर, योगेश खरपुडे, विलास भोजणे व गौतम जायभाय यांनी मिळवला आहे.

‘द अल्‍टिमेट ह्यूमन रेस’ असे या ‘कॉम्रेड्‌स मॅरेथॉन’चे वर्णन करण्‍यात येते. ही स्‍पर्धा जगातील सर्वांत कठीण स्‍पर्धा मानली जाते. सुमारे 89 कि.मी.चे अंतर स्‍पर्धकांनी बारा तासांत पूर्ण करण्‍याचे आव्‍हान त्यात असते.यंदा मात्र स्‍पर्धेचे हे अंतर 87.7 किलोमीटर ठेवण्‍यात आले होते. या स्‍पर्धेत भारतातून सुमारे 403 स्‍पर्धक सहभागी झाले होते. जगभरातील हजारो स्‍पर्धकांचा समावेश असलेली ही मॅरेथॉन वेळेत पूर्ण करू शकले. याबद्दल निश्चित अभिमान वाटतो’ असे स्पर्धकांनी यावेळी सांगितले. या यशस्वी कामगिरी करणाऱ्या नगरच्या चारही स्पर्धकांचे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल च्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले. यावर्षी सुमारे २० हजार स्पर्धकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता.

जगदीप माकर यांनी सांगितले की, यंदाची ही स्‍पर्धा बरीच कठीण होती. ३० किलोमीटर अंतर पूर्ण केल्‍यानंतर ही स्‍पर्धा सोडून द्यावी, असा विचार मनात आला होता. मात्रनंतर मनाचा दृढ निश्चय व काही झाले तरी ही स्‍पर्धा पूर्ण करायची आहे, अशी जिद्द मनात ठेवून धावण्‍यास पुन्हा सुरुवात केली. ठरलेल्‍या बारा तासांच्या आत अंतर गाठले देखील. यावेळी सुमारे १२०० मीटर उंचीचा चढ असलेल्या मार्ग सर करावा लागतो. स्पर्धा सुरु झाली तेव्हा वातावरणाचा पारा ४अंश सेल्सिअस इतका होता व मॅरेथॉन संपेपर्यंत उच्चत्तम पारा ३२ अंश सेल्सिअस इतका नोंदविला गेला होता तरीदेखील मनातील जिद्द व भारतीय म्हणून सदर स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थितीत भारतीयांचा जल्लोषामुळे अंगात वेगळाच उत्साह संचारला होता.

या प्रेरणेतून बारा तासांत पूर्ण करायची स्पर्धा नगरच्या चारही स्पर्धकांनी अवघ्या ११ तासांच्या आत पूर्ण केली. नगरचे तसेच भारताचे नाव जगाच्या पटलावर सुवर्णाक्षरात कोरले. दक्षिण आफ्रिकेतील क्वायझुल्लू नताल प्रांतात दरवर्षी डरबन आणि पीटर मेरिटजबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर पार करताना सहा टप्पे असतात. ते सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. कट ऑफ टाइमिंग नंतर एखाद्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यास स्पर्धकाला पुढे जाण्याची परवानगी नसते. 90 किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्यांनाच पदक दिले जाते.

या मॅरेथॉन स्पर्धेची तयारी जानेवारीपासूनच सुरू झाली होती. तर 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावण्याचा सराव त्यांनी केला. तसेच सर्वात जास्त सराव हा लवासा घाटात केला. सर्वात जास्त लक्ष हे नियमित स्ट्रेचिंग, भरपूर झोप आणि योग्य आहार यावर दिले असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष हरीश नय्यर, सचिव डॉ. कुणाल कोल्हे तसेच माजी अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube