काय सांगता! एकाच चेंडूत दहा रन, कसोटीत कसा घडला ‘हा’ चमत्कार? जाणून घ्याच..
BAN vs SA Test Match : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील फायनलमध्ये कोणते दोन संघ असतील याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. यासाठीची स्पर्धा सुद्धा उत्कंठावर्धक होत आहे. यातच दक्षिण आफ्रिकेने (BAN vs SA) बांग्लादेश दौऱ्यातील पहिला कसोटी सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यातही आफ्रिकेची स्थिती (South Africa) मजबूत दिसत आहे. दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होईपर्यंत आफ्रिकेने बांग्लादेशला (Bangladesh) बॅकफूटवर ढकलले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असे काही घडले ज्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे. खरे तर हा प्रकार क्रिकेटच्या इतिहासात (Cricket News) कधी घडला असेल याची शक्यता वाटत नाही. बांग्लादेशची फलंदाजी सुरू झाली तेव्हा धावफलकावर एका चेंडूत १० धावा दिसत होत्या. आता तुम्ही म्हणाल की एका बॉलमध्ये १० धावा कशा शक्य आहेत. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या..
South Africa : ‘चोकर्स’ म्हणजे काय? दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमला हा टॅग का मिळाला?
खरं तर बांग्लादेशच्या फलंदाजीला सुरूवात होताच पेनल्टीच्या पाच धावा संघाला मिळाल्या होत्या. एस. मुथूसामी खेळपट्टीवर पळाल्याने आफ्रिका संघाला शिक्षा म्हणून या पाच धावा बांग्लादेशला देण्यात आल्या. दक्षिण आफ्रिकेच्या सेनुरन मुथूसामीने नाबाद ६८ धावा केल्या. यावेळी तो खेळपट्टीवर पळताना दिसून आला होता. यामुळे साऊथ आफ्रिकेला पाच धावांची पेनल्टी सहन करावी लागली. पुढे याच पाच धावा बांग्लादेशच्या स्कोअरमध्ये जोडल्या गेल्या.
यानंतर वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) बांग्लादेश विरुद्ध गोलंदाजीला सुरूवात केली. पहिल्या चेंडूवर कोणताही रन मिळाला नाही. दुसरा चेंडू मात्र नो बॉल दिला गेला. यावर बायच्या चार अतिरिक्त धावा बांग्लादेशला मिळाल्या. अशा प्रकारे आणखी पाच धावा बांग्लादेशला मिळाल्या आणि एकाच चेंडूत धावा करण्याची किमया बांग्लादेशने करून दाखवली.