टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात; इंग्लंडचा 57 धावांनी केला पराभव
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया 57 धावांनी विजयी.

Australia Beat England : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात (AUS vs ENG) तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जिगरबाज खेळ करत इंग्लंडला धूळ चारली. पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा 57 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 198 धावा केल्या. यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला 141 धावांवरच रोखले. ऑस्ट्रेलियाकडून बेन मूनीने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. तिच्या या फलंदाजीच्या जोरावर संघाला इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य देता आले.
भारताच्या लेकींची कमाल! बांग्लादेशचा पराभव करत आशिया चषकावर कोरलं नाव
यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लीश संघाची सुरुवात खराब राहिली. पहिल्या दोन षटकांतच दोन फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे संघावरील दडपण वाढलं. या दडपणातून इंग्लंडला शेवटपर्यंत बाहेर पडता आलं नाही. सोफिया डंकलेने एकाकी झुंज दिली. तिने 30 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार खेचत 59 धावा केल्या. परंतु, अन्य फलंदाजांची साथ तिला मिळाली. दुसऱ्या बाजूने विकेट पडत राहिल्या. त्यामुळे इंग्लंडला पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. 16 षटकांत 141 धावा काढून सर्वबाद झाला.