Video : विराटचा धक्का अन् ऑस्ट्रेलियाचा सॅम भडकला; मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Boxing Day Test : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी (IND vs AUS Boxing Day Test) सामन्यास सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातील दहा ओव्हर्स संपल्या नाही तोच मैदानात खेळाडू्ंमध्ये वाद होताना दिसून आले. विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा नवखा खेळाडू सॅम कॉन्स्टस (Sam Constas) यांच्यात वादावादी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू सॅम कॉन्स्टस फक्त 19 वर्षांचा आहे आणि पदार्पणातच त्याने थेट टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीशी पंगा घेतला आहे.
विराट कोहली क्रिकेट विश्वात एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. सॅम कॉन्स्सला कदाचित या गोष्टीचा अंदाज नसेल की त्याचा वाद याच विराटशी होईल. परंतु, कसोटी सामन्यात दहावी ओव्हर संपल्यानंतर असाच काहीसा प्रकार दिसून आला. हा वाद नेमका कशामुळे झाला हे देखील जाणून घेऊ या..
Virat Kohli and Sam Konstas exchanged a heated moment on the MCG. #AUSvIND pic.twitter.com/QL13nZ9IGI
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
सामन्यातील दहावी ओव्हर संपल्यानंतर विराट कोहली समोरून चालत येत होता. त्याचवेळी त्याने सॅम कॉन्स्टला खांदा मारला. आता यावर प्रतिक्रिया येणारच नाही असे नाही. सॅम कॉन्स्टसनेही लागलीच प्रतिक्रिया देत कोहलीशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे दोघांत काही काळ शाब्दिक वाद झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
वादाचं कारण काय?
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दहा ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने 24 धावा केल्या होत्या. यातील 14 धावा एकट्या बुमराहच्या गोलंदाजीवर चोपल्या होत्या. तसेच बुमराह विरुद्ध 4 हजार 483 चेंडू्ंनंतर षटकार ठोकणारा कॉन्स्टस फलंदाज ठरला होता. इतकेच नाही तर बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने काही अप्रतिम रिवर्स स्वीप शॉटही खेळले होते. त्यामुळे या नव्या खेळाडूला त्याच्याच आक्रमक भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न विराटने केला असावा अशी चर्चा सुरू होती.
रोमहर्षक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय; विराट कोहलीचे शतक अन् विक्रमही हुकला
तसं पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना असेल आणि काही वाद होणार नाही असे शक्यतो घडत नाही. त्यामुळे या दोघा खेळाडूंत जो वाद झाला त्याचं फार आश्चर्य वाटायला नको. यानंतर सॅम कॉन्स्टसने 60 धावांंवर असताना बाद झाला. परंतु, दोन्ही खेळाडूंतील हा वाद प्रत्येकाच्या तोंडोतोंडी आहे.