IND vs SA : टीम इंडियाला डबल फायदा; सामना जिंकला अन् WTC यादीतही अव्वल
IND vs SA : केपटाऊन ( Cape Town) कसोटीच्या (Test Series) पहिल्या डावात भारताचा (IND vs SA) संघ 153 धावांत गारद झाला होता. त्यात 11 चेंडूत सहा फलंदाज भोपळाही फोडू न शकल्याने भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केपटाऊन कसोटी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सात विकेटने धूळ चारत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या विजयानंतर टीम इंडियाला आणखी एक मोठा फायदा झाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे मोठे नुकसान झाले आहे. WTC गुणतालिकेत भारतीय संघ पुन्हा पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. दक्षिण आफ्रिकेची मात्र सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
IND vs SA: भारताचा केपटाऊनमध्ये कसोटी जिंकण्याचा पहिल्यांदाच पराक्रम, मालिकाही बरोबरीत सोडली
या विजयानंतर WTC गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे. भारताची विजयी टक्केवारी 54.16 टक्के इतकी झाली आहे. तर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश 50 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसचे पाकिस्तान, वेस्टइंडिज, इंग्लंड आणि श्रीलंकेचा नंबर त्यानंतर आहे. या विजयानंतर भारताने परदेशात मोठे यश मिळवले आहे. महेंद्रसिंह धोनीनंतर परदेशात कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात रोहित शर्माला यश मिळाले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 79 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. ही कसोटी अवघ्या दोन दिवसांत संपली. त्यात दोन्ही संघातील गोलंदाजांची बोलबाला राहिला. सिराजने पहिल्या डावात सहा, आणि जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात सहा बळी घेत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. या कसोटीत सिराजने सात आणि बुमराहने आठ बळी घेतले आहेत. बुमराह हा मालिकावीर ठरला.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांत गुंडाळला होता. तर भारताने पहिल्या डावात 153 धावा करत आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ 176 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताला विजयसाठी अवघ्या 79 धावांची गरज होती.
मार्करमचे झुंजार शतक
या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर आफ्रिकेची फलंदाजी अपयशी ठरली. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. या गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा डाव गडगडला. एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यामुळे अवघ्या 176 धावांवर अख्खा संघ गारद झाला. आफ्रिकेकडून एडन मार्करमने मात्र झुंजार खेळी करत 106 धावांची खेळी केली. इतर फलंदाज खास काही करू शकले नाहीत.