SRH : काव्या मारनच्या हास्याला झाले 7 वर्ष; आजच्याच दिवशी हैदराबादने रचला होता इतिहास
On This Day:हैद्राबादची मालकीण लाखो तरूणांची क्रश असणाऱ्या काव्या मारनचा सनरायझर्स हैदराबाद संघ सात वर्षांपूर्वी, या दिवशी (29 मे)प्रथमच आयपीएल चॅम्पियन बनला होता. हैदराबाद संघाने अंतिम फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने जेतेपद पटकावत मोठा विक्रम केला. आतापर्यंत अशी कामगिरी करणारा हैदराबाद हा एकमेव संघ आहे.
वास्तविक, एलिमिनेटर सामना खेळूनही जेतेपद पटकावण्यात हैदराबादचा संघ यशस्वी ठरला. एलिमिनेटर सामना खेळून ट्रॉफी जिंकणारा हैदराबाद हा आयपीएल इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. मात्र, हा विक्रम आजही हैदराबादच्याच नावावर आहे. हैदराबादने साखळी सामन्यांमध्ये 16 गुण मिळवून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले, त्यानंतर त्यांना एलिमिनेटर सामना खेळावा लागला.
एलिमिनेटर सामन्यापासून हा प्रवास असा वाढत गेला
हैदराबादने एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना केला, ज्यामध्ये वॉर्नर सेनेने 22 धावांनी विजय मिळवून क्वालिफायर-2 मध्ये स्थान निश्चित केले. यानंतर संघ गुजरात लायन्स विरुद्ध क्वालिफायर-2 खेळला, ज्यामध्ये हैदराबादने 4 विकेट्सने विजय मिळवत संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत हैदराबादचा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावा केल्या. संघासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 69 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.
धावांचा पाठलाग करताना बंगळुरू संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 200 धावा करता आल्या. अशा प्रकारे हैदराबादने 8 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. आरसीबीसाठी ख्रिस गेलने 200 च्या स्ट्राईक रेटने 76 धावांची खेळी खेळली होती, परंतु त्याची खेळी आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ शकली नाही.