RCB vs RR : करो या मरो’ च्या लढतीत RCB चा 112 धावांनी विजय, गुणतालिकेत घेतली मोठी झेप
RCB vs RR : आयपीएल 2023 च्या एका महत्त्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. 14 मे (रविवार) रोजी सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानला 172 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 10.3 षटकात 59 धावांवर गारद झाला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचे फलंदाज सुरुवातीपासूनच पॅव्हेलियनकडे जाण्याचा मार्ग मोजत गेले. सलामीवीर फलंदाज जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी संजू सॅमसन (4), जो रूट (10), देवदत्त पडिक्कल (4) आणि ध्रुव जुरेल (1) विशेष काही करू शकले नाहीत. फक्त शिमरॉन हेटमायर लढू शकला. हेटमायरने 19 चेंडूत 35 धावा केल्या ज्यात चार षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
राजस्थान रॉयल्सचे फक्त दोन फलंदाज (संजू सॅमसन आणि हेटमायर) दुहेरी आकडा गाठू शकले. सामनावीर वेन पारनेलने आरसीबीकडून सर्वाधिक तीन बळी घेतले. दुसरीकडे कर्ण शर्मा आणि मायकेल ब्रेसवेल यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 59 धावा ही आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही संघाची तिसरी सर्वात कमी धावसंख्या होती. तसेच, राजस्थान रॉयल्सची आयपीएल इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा परवानगीशिवाय गैरवापर, अज्ञातांविरुध्द FIR दाखल
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने पाच गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा केल्या. आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 44 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने 33 चेंडूत 54 धावा केल्या. शेवटच्या षटकात अनुज रावतने 2 षटकार मारले आणि 11 चेंडूत 29 धावा केल्या. राजस्थानकडून अॅडम झम्पा आणि केएम आसिफने 2-2 बळी घेतले.
या सीझनमध्ये फाफ डू प्लेसिसची टीम बेंगळुरू आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा दुसरा सामना होता. याआधी 23 एप्रिल रोजी दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. त्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाने 7 धावांनी विजय मिळवला होता.