आयर्लंडसाठी ‘मार्च’ लकी! पहिलाच कसोटी विजय मिळवत रचला इतिहास; अफगाणिस्तानचा पराभव
Ireland beat Afghanistan in Test Cricket : क्रिकेटमधील नवखा संघ आयर्लंडसाठी कालचा दिवस (1 मार्च) लकी ठरला. या दिवशी आयरिश संघाने (Ireland vs Afghanistan) अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामन्याची मालिका सहा गडी राखून जिंकली. या संघाचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिलाच विजय आहे. आयर्लंडने याआधी सात सामने खेळले आहेत. मात्र, या सगळ्यात सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. या सामन्यात मात्र त्यांनी अफगाणिस्तानला (Afghanistan) धूळ चारून विजयाची सुरुवात केली.
या सामन्यात अफगाणिस्तानने फक्त 111 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयरिश संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीला 13 धावांवर असतानाच तीन धक्के बसले होते. यानंतर कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने पॉल स्टर्लिंगसोबत चौथ्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. यानंतर लोर्कन टकरसोबत 72 धावांची भागीदारी झाली आणि संघाने सामना जिंकला. कर्णधार बालबर्नीने नाबाद 58 धावा केल्या. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये नसल्याने बहुतेक वेळा आयर्लंडला फक्त एक कसोटी सामन्याचीच मालिक खेळता येते.
IND vs IRE : पहिल्याच सामन्यात पावसाचा खेळ! टीम इंडियाने अवघ्या 2 धावांनी सामना जिंकला
या सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. त्यापुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्याचे दिसून आले. वेगवान गोलंदाज मार्क अडायरने पहिल्याच डावात पाच विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही अचूक गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. या सामन्यातील दोन्ही डावांत अफगाणिस्तानची फलंदाजी अतिशय खराब राहिली. फलंदाज जास्त काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर आयरिश संघाने सहज विजय मिळवला.