5 सामने, 0 विकेट! ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहला नेमकं झालंय काय?
एकेकाळी बुमराहच्या ओव्हरमध्ये फक्त सर्वाइव्ह करण्याचं फलंदाजांचं धोरण असायचं.
ज्याला क्रिकेट जगतातील ‘यॉर्कर किंग’ (IPL) म्हटलं जातं, ज्याच्या गोलंदाजीसमोर जगातले दिग्गज फलंदाज थरथर कापायचे, तोच जसप्रीत बुमराह आयपीएल 2026 मध्ये मात्र स्वतःची ओळख शोधतोय. 5 सामने आणि खात्यात एकही विकेट नाही. ज्या मुंबई इंडियन्सचा बुमराह सर्वात मोठा आधारस्तंभ होता, आज त्याच टीमसाठी बुमराहची फॉर्म चिंतेचा विषय ठरली आहे. बुमराहला नेमकं काय झालंय? समजून घेऊया.
जसप्रीत बुमराहसाठी हा सीझन एखाद्या भीषण स्वप्नासारखा ठरतोय. 5 सामन्यांच्या स्पेलमध्ये त्याने जवळपास 19 ओव्हर्स फेकल्या आहेत, मात्र विकेट्सचा आकडा अजूनही ‘शून्य’ आहे. आयपीएल इतिहासात बुमराहसोबत असं पहिल्यांदाच घडतंय. 2014 मध्ये तो सलग 4 सामन्यात विकेटलेस राहिला होता, पण यावेळी हा विक्रमही मोडीत निघालाय. विकेट्स मिळत नसल्याने बुमराहच्या देहबोलीतही तो जुना आक्रमकपणा आणि उत्साह दिसत नाहीये.
Vaibhav Suryavanshi : भारतीय संघात एन्ट्री करणार वैभव सूर्यवंशी; या खेळाडूची घेणार जागा
बुमराहची खरी ताकद म्हणजे त्याचे भेदक यॉर्कर. पण या सीझनमध्ये फलंदाज बुमराहच्या यॉर्करवर चक्क षटकार ठोकतायत. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात बुमराहची अचूकता कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसले. मुंबई इंडियन्सचे कोच महेला जयवर्धने यांनी याचा खुलासा करताना सांगितलं की, टी-20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान बुमराहला किरकोळ दुखापत झाली होती. कदाचित या दुखापतीचा आणि थकव्याचा परिणाम त्याच्या वेगावर आणि अचूकतेवर होत असावा.
एकेकाळी बुमराहच्या ओव्हरमध्ये फक्त सर्वाइव्ह करण्याचं फलंदाजांचं धोरण असायचं. मात्र, आता चित्र पूर्णपणे बदललंय. अगदी 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी सारख्या युवा खेळाडूनेही बुमराहच्या बॉल्सवर बेधडक प्रहार केले आहेत. प्रतिस्पर्धी संघांनी आता बुमराहच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळण्याचा निर्णय घेतलाय. जो दबदबा बुमराहने गेल्या दशकात निर्माण केला होता, तो या सीझनमध्ये कुठेतरी धूसर होताना दिसतोय.
बुमराहच्या खराब फॉर्मचा थेट फटका मुंबई इंडियन्सला बसला आहे. 5 पैकी 4 सामने हरलेली मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे असलेलं नेतृत्व आणि बुमराहची शांत राहिलेली विकेट घेण्याची क्षमता, यामुळे टीमच्या रणनीतीचा पुरता फज्जा उडाला आहे. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी तर हार्दिकला हटवून पुन्हा रोहितला कर्णधार करण्याची मागणीही केलीय.
बुमराह पुन्हा एकदा त्याच वेगाने आणि त्याच यॉर्करसह मैदानात परतेल का? की दुखापतीमुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागलीय? तुम्हाला काय वाटतं, मुंबई इंडियन्सने पुनरागमन करण्यासाठी काय बदल करायला हवेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा.