12 नावं, 11 महिला आणि कोट्यवधींची लूट : कलीयुगातील ‘लखोबा लोखंडे’

loot आदर्श म्हात्रेने चक्क 'इस्रो'चा शास्त्रज्ञ असल्याचं सांगत 11 उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढले आणि त्यांच्या आयुष्याशी क्रूर खेळ केला.

Loot

12 names, 11 women and loot worth crores: ‘Lakhoba Lokhande’ in Kali Yuga : आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या अजरामर नाटकातील ‘लखोबा लोखंडे’ आठवतोय? प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने साकारलेला तो बहुरुपी भामटा, जो वेगवेगळ्या नावांनी आणि रूपांनी महिलांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करायचा. रंगभूमीवरील हे काल्पनिक पात्र आजही अनेकांच्या स्मरणात आहे, मात्र दुर्दैवाने 21 व्या शतकात नवी मुंबईत एका ‘कलयुगी’ लखोबा लोखंडेचा पर्दाफाश झालाय. आदर्श म्हात्रे नावाच्या या भामट्याने चक्क ‘इस्रो’चा शास्त्रज्ञ असल्याचा बनावट मुखवटा ओढून राज्यातील तब्बल 11 उच्चशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्या आयुष्याशी क्रूर खेळ खेळला.

कोंबड्यांची झुंज पडली महागात… अहिल्यानगरमध्ये 21 जणांवर गुन्हा दाखल

केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या या आधुनिक भामट्याची ‘मोडस ऑपरेंडी’ अतिशय थक्क करणारी आहे. मॅट्रिमोनी साईट्स आणि सोशल मीडियाचा वापर करून त्याने आपले एक ग्लॅमरस जग उभे केले होते. कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, तर कधी पीडब्ल्यूडीमधील बडा अधिकारी अशी खोटी ओळख सांगून त्याने डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी असलेल्या महिलांना हेरले. स्वतःचे राहणीमान एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून त्याने या महिलांचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे केवळ आर्थिकच नव्हे, तर शारीरिक शोषणही केले. आदर्श म्हात्रेने आपल्या या काळ्या कारनाम्यांसाठी स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुश म्हात्रे यांसारखी तब्बल 12 खोटी नावे वापरल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाल्यानंतर आली वीज, ‘हे’ गाव कोणतं?

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या भामट्याने एका महिलेकडून लुटलेले पैसे दुसऱ्या महिलेवर प्रभाव टाकण्यासाठी वापरले. तो या पैशांचा वापर महागड्या हॉटेलमध्ये राहणे, चैनीचे आयुष्य जगणे आणि कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी करायचा. नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड ते थेट नागपूर आणि यवतमाळपर्यंत त्याने आपल्या फसवणुकीचे जाळे विणले होते. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातने ज्याप्रमाणे महिलांना लुटले, त्याच धर्तीवर या ‘बोगस शास्त्रज्ञाने’ महिलांच्या भावनांशी खेळ करून लाखो रुपये उकळले आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे अखेर या बहुरुपी गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत.

… म्हणून निर्मित सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी मकरंद अनासपुरेंची मदत घेतली

पोलीस तपासात समोर आलेली माहिती पाहता, फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. बदनामीच्या धास्तीने अनेक पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अशा गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पीडितांनी न घाबरता समोर येणे गरजेचे आहे. या ‘लखोबा लोखंडे’ने केवळ आर्थिक लूट केली नसून, अनेक कुटुंबांचा विश्वास आणि महिलांचा सन्मान धुळीस मिळवलाय. नवी मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याने आणखी किती जणांना गंडा घातला आहे, याचा तपास सुरू केलाय.

मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून सुटका हवी? ‘हे’ घरगुती उपाय करून बघा!

या घटनेने डिजिटल युगातील धोके पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत. विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवर भेटणाऱ्या व्यक्तीची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत, असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलंय. आभासी जगातील ‘चमकधमक’ पाहून भुलून जाण्याऐवजी, समोरच्या व्यक्तीच्या पदाची आणि चारित्राची खात्री करणे आता काळाची गरज बनलीय. नवी मुंबईत उघडकीस आलेला हा प्रकार सुजाण नागरिकांसाठी एक धोक्याची घंटा असून, अशा भामट्यांपासून सावध राहणे हाच सर्वात मोठा बचाव आहे.

 

follow us