कोल्हेंचे आंदोलन टाळून अतुल बेनके थेट दिल्लीत; पुण्यातील आठवा आमदार अजितदादांच्या गोटात?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 37 ते 38 आमदार आपल्याकडे खेचले आहेत. तर 15 ते 16 आमदार शरद पवारांसोबत (Sharad Pawar) कायम राहिले. मात्र यातही कुंपणावर असलेल्या आमदांची संख्या जास्त आहे. याच आमदारांमध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांचा समावेश होता. मात्र बेनके यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यामुळे ते आता अधिकृत नसले तरी अप्रत्यक्षपणे अजितदादांच्या गोटात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Atul Benke in Delhi to meet Piyush Goyal avoiding Amol Kolhe’s agitation)
मागील काही दिवसांपासून राज्यातील कांदा प्रश्न पडला आहे. यावर उपाय म्हणून आज (22 ऑगस्ट) कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्याचवेळी मुंडेंसोबत अतुल बेनके हेही उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ज्यावेळी बेनके दिल्लीत होते, त्याचवेळी त्यांच्या मतदारसंघात म्हणजे जुन्नरमधील आळेफाटा इथे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे कांदा प्रश्नीच आंदोलन करत होते. मात्र कोल्हेंचे आंदोलन टाळून बेनके यांनी थेट मुंडेंसोबत दिल्ली गाठली आणि कांद्याचा प्रश्न गोयल यांच्या कानावर घातला. याच कृतीमुळे बेनके सध्या कोणासोबत आहेत, याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम कायम आहे.
कांदा खरेदीचा निर्णय ऐतिहासिक, मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 आमदारांपैकी इंदापूरचे दत्तात्रय भरणे, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, पिंपरीचे अण्णा बनसोडे, मावळचे सुनिल शेळके, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, खेडचे दिलीप मोहिते हे 6 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर चेतन तुपे आणि अशोक पवार हे शरद पवारांसोबत कायम राहिले आहेत. तर अतुल बेनके यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. मात्र आता खासदार कोल्हेंना टाळून बेनके मुंडेंसोबत दिल्लीत उपस्थित राहिले आहेत.
Modi Government : 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक, 2 लाख मेट्रिक टन खरेदीचा तोडगा वादात!
निवडणूक न लढण्याचा निर्णय :
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बेनके यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे मंत्री दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांनी बेनके यांची भेट घेतली होती. पण “ज्यांना जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या, मी तटस्थ राहणार आहे. पाणी प्रश्नासाठी संघर्ष करणार पण निवडणूक लढणार नाही” अशी घोषणा बेनके यांनी केली होती. मात्र आता बेनके आपली भूमिका बदलतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.