राजीनाम्यानंतर Balasaheb Thorat आज काय बोलणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले

राजीनाम्यानंतर Balasaheb Thorat आज काय बोलणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचं म्हंटले होते. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता. दरम्यान थोरात हे आज संगमनेरमध्ये येणार असल्याने राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे (Congress) माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकला जात असताना अपघात झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. याचदरम्यान नाशिक पदवीधार निवडणुकीतील उमेदवारीवरून पक्षात वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.

काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी अपक्ष लढत ही निवडणूक जिंकली. त्यानंतर तांबे यांनी काँग्रेसवर काही आरोप देखील केले.

यातच या निवडणुकीवरून तांबे आणि थोरात यांच्यात देखील शीतयुद्ध सुरु झाले. नाना पटोले यांनी देखील या प्रकरणावरून थोरात यांच्यावर निशाणा साधला. यामुळे थोरात व्यथित होते अशी माहिती देखील समोर आली होती.

Turkey Earthquake : दर्जाहीन बांधकाम करणाऱ्या बिल्डरांच्या मुसक्या आवळल्या

विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये झालेला गोंधळ व पक्षातील नेत्यांकडून होणारी कुचंबणा यामुळे काँग्रेसचे विधीमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी 7 फेब्रुवारी रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते.

दरम्यान उपचारानंतर थोरात हे आज संगमनेरमध्ये येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादावर थोरात आज काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. थोरात यांचे आज संगमनेरात जंगी स्वागत देखील करण्यात येणार आहे. तसेच थोरात यांची आज सभा देखील होणार असल्याने थोरातांच्या आजच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube