अजब महाराष्ट्राचे गजब राजकारण : आमदारकीच्या हव्यासापोटी विभागली गेलेली राजकीय कुटुंब

  • Written By: Published:
अजब महाराष्ट्राचे गजब राजकारण : आमदारकीच्या हव्यासापोटी विभागली गेलेली राजकीय कुटुंब

Maharashtra Assembly Election 2024 : पहिले शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट आपण सर्वांनी जवळून पाहिली आणि अनुभवली. या दोन्ही पक्षातील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलेली आहे. त्यात विधानसभा निवडणुकांच्या घोषणा झाल्यापासून अनेकांनी पक्षांतर करण्यास सुरूवात केली आहे. यात प्रामुख्याने दिग्गज राजकीय कुटुंबियांची मुले आघाडीवर आहेत. ही पक्षांतर केवळ आणि केवळ आमदारकीच्या हव्यासापोटी झाल्यानेच ही कुटुंब विभागली गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विधानसभेच्या तोंडावर याच विभागलेल्या राजकीय कुटुंबियांचा घेतलाला हा सविस्तर आढावा.

मोठी बातमी : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बाजी मारण्यासाठी अजितदादांसह 38 शिलेदार मैदानात

केवळ ठाकरे-पवार कुटुंबच नव्हे तर…

महाराष्ट्रात केवळ पवार आणि ठाकरे घराणेच दोन राजकीय गटात विभागलेले नाहीत, तर राणे घराण्यापासून ते नाईक घराण्यापर्यंत हीच परिस्थिती दिसून येत आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही लिटमस टेस्ट आहे.  तर, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे भाजपचे खासदार आहेत, तर त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश नाईक भाजपकडून निवडणूक लढवत असताना, त्यांचा मुलगा संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तुतारी फुंकली आहे. छगन भुजबळ यांचे पुतणेदेखील उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. समीर भुजबळ हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून नांदगावमधून आमदारकीसाठी मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत.

 निलेश राणेंनी पुन्हा हाती घेतलं ‘धनुष्यबाण’ 

नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हेही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, त्यासाठी त्यांनी कणकवलीला लागून असलेल्या कुडाळ मतदारसंघाची निवड केली आहे. हा मतदारसंघ सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्यानेच निलेश यांनी भाजपला रामराम करत पुन्हा एकदा शिवधनुष्य पेलले आहे. सिंधुदुर्गातील राणे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व पाहता एकनाथ शिंदे त्यांना निवडणुकीत उतरवू शकतात, असे मानले जात आहे.

शिवसेनेची 45 नावांची पहिली यादी जाहीर; बंडात साथ दिलेल्या सर्वांना CM शिंदेंकडून उमेदवारी

नाईक कुटुंब भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये विभागले गेले

नवी मुंबईच्या राजकारणावर नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपने गणेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे, मात्र त्यांचा मुलगा संदीप नाईक यांनी भाजपला रामराम करत आमदार होण्याच्या इच्छेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक यांना बेलापूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती, पण तिकीट न मिळाल्याने त्यांनी राजकीय भूमिका बदलली. गणेश नाईक 2019 पर्यंत राष्ट्रवादीत (एकसंघ राष्ट्रवादी) होते आणि निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये दाखल झाले, पण आता वडील भाजपमध्ये आहेत आणि मुलाने शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे नाईक कुटुंब दोन गटात विभागले गेले आहे.

महाडिक कुटुंबातही फूट पडणार?

भाजपचे दिग्गज नेते धनंजय महाडिक यांचे कुटुंबही दोन पक्षांत फुटण्याच्या मार्गावर आहे. धनंजय महाडिक हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. महाडिक यांचे थोरले चिरंजीव कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र जागावाटपात ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेच्या कोट्यात गेली आहे. त्यासाठी धनंजय महाडिक यांनी मुलासाठी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. पण शिंदे यांच्या पक्षाचे राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या शर्यतीत आहेत. शिंदे यांनी कोल्हापूरची जागा भाजपला सोडली नाही तर, कृष्णराज महाडिक पक्षांतर करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. असे झाल्यास राणे, नाईक यांच्या पंगतीत महाडिक कुटुंबियांचाही समावेश होऊ शकतो.

मोठी बातमी! अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, मनसेकडून दुसरी यादी जाहीर

गोकुळ विरुद्ध नरहरी झिरवाळ

येत्या विधानभा निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नरहरी झिरवळ यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. वडिलांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी संबंध तोडत शरद पवारांना साथ दिली आहे. तसेच मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, मात्र पवारांनी दिंडोरीतून दुसऱ्या कोणाला उमेदवारी दिल्यास मी पाठिंबा देईन असेही गोकुळ यांनी म्हटले आहे. पण जर, पवारांच्या पक्षाने गोकुळ यांना उमेदवारी दिल्यास दिंडोरीची लढत पिता-पुत्रांमध्येच होणार असल्याचे नक्की मानले जात आहे.

वडिलांवोरोधात मुलीचं बंड

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरातदेखील फूट पडली आहे. अत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला असून, अजित पवारांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत धर्मराव बाबा अत्राम यांना पुन्हा एकदा अहेरीतून उमेदवारी जाहीर केली आहे. तर, अत्राम यांच्या मुलीला शरद पवारांकडून याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे वडील आणि मुलीमध्ये या ठिकाणी थेट लढत होऊ शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube