इंदापुरात ट्विस्ट! हर्षवर्धन पाटलांना निवडणूक अवघड; चुलत बंधू्चा अपक्षाला पाठिंबा
Pune News : इंदापूर मतदारसंघात शरद पवार गटाने भाजपातून आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीस पक्षातूनच मोठा विरोध झाला. परंतु, तरीही हा विरोध शांत करत शरद पवारांनी पाटील यांनाच तिकीट फायनल केलं. यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी कमी होतील असे वाटत असतानाच नव्या अडचणी उभ्या राहत आहेत. आता तर त्यांच्या कुटुंबातूनच बंडाळी सुरू झाली आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व हर्षवर्धन पाटील याचे चुलत भाऊ मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा तिसरा धक्का ठरला आहे. याआधी भरत शहा आणि अप्पासाहेब जगदाळे यांनी त्यांची साथ सोडली आहे. मयूरसिंह पाटील यांनी या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच त्यांनी पाठिंबा जाहीर केला. जनता आता आजी माजी उमेदवार नको, असं म्हणत आहे. जे विचार घेऊन मी काम करत होतो त्यांना तिलांजली देण्याचे काम आमच्या घरातल्या लोकांनी केले.
हर्षवर्धन पाटील यांना महायुतीत तिकीट मिळणार नाही याचा अंदाज आला होता. झालंही तसंच. जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाट्याला गेला. अजित पवारांनी येथून आमदार दत्ताभ भरणे यांना तिकीट दिलं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केला. परंतु, पाटील यांना सुरुवातीपासूनच विरोध होत होता.
पक्षात आल्यानंतरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना संंधी दिली. आता हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे स्वपक्षातच बंडखोरी आणि नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना सध्या दोन आघाड्यांवर लढावं लागत आहे. अशात यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी कठीण ठरत चालली आहे.