स्वराज्याच्या गुप्त मोहिमांचा थरार आता मोठ्या पडद्यावर; ‘बहिर्जी’च्या मोशन पोस्टरने वाढवली उत्सुकता!
Bahirji Movie Poster Released: अंश मिडिया वर्क्स निर्मित आगामी भव्य चित्रपट ‘बहिर्जी’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.
Bahirji Movie Poster Released: स्वराज्याच्या शत्रूंच्या गोटात शिरून त्यांची रणनीती जाणून घेणारा, शत्रूला चकवा देत महाराजांच्या मोहिमांना यश मिळवून देणारा आणि इतिहासाच्या पानांमध्ये आजही गूढतेची झालर लाभलेला बहिर्जी नाईक… या असामान्य गुप्तहेराच्या शौर्याची, बुद्धिचातुर्याची आणि स्वराज्याप्रती असलेल्या निष्ठेची कहाणी आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अंश मिडिया वर्क्स निर्मित आगामी भव्य चित्रपट ‘बहिर्जी’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मोशन पोस्टरने चित्रपटाच्या रहस्यमयी विश्वाची झलक प्रेक्षकांसमोर आणली असून, त्यातून एकेक करत समोर येणारे चेहरे, त्यांच्या नजरेतील तीक्ष्णता आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा भारदस्त लुक चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.
मोशन पोस्टरमध्ये दिसणारे प्रत्येक पात्र काहीतरी सांगू पाहातेय… कोणाच्या नजरेत युद्धाचा आवेश, तर कोणाच्या चेहऱ्यावर गुप्त मोहिमेची गंभीरता! वेगवेगळ्या रूपांत समोर येणारे हे चेहरे स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची आणि त्या काळातील गुप्त मोहिमांची झलक देतात. या व्यक्तिरेखा नेमक्या कोणत्या असणार, त्यांच्यातील नातेसंबंध काय असणार आणि स्वराज्याच्या या गुप्त विश्वात कोणाची भूमिका निर्णायक ठरणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे लेखन युवराज पाटील यांनी केले आहे.
Jimmy Sheirgill : अभिनेता जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहलची दमदार एन्ट्री; ‘प्यादे’चा ट्रेलर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या प्रवासात बहिर्जी नाईक यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, त्यांच्या कार्याचा आणि आयुष्यातील अनेक पैलूंचा तपशील आजही इतिहासाच्या पडद्याआड आहे. याच अज्ञात विश्वाचा शोध घेत, बहिर्जींच्या बुद्धिचातुर्याचा, धाडसाचा आणि स्वराज्याप्रती समर्पणाचा थरार या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.
दिग्दर्शक राहुल जाधव म्हणतात, “बहिर्जी नाईक यांचं व्यक्तिमत्त्व जितकं विलक्षण आहे, तितकंच त्यांचं कार्य रहस्यमय आहे. या चित्रपटासाठी आम्ही ऐतिहासिक संदर्भांचा सखोल अभ्यास केला, संशोधन केलं आणि त्या काळातील वातावरण, मोहिमा व व्यक्तिरेखांचं विश्व उभं करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. मोशन पोस्टरमधून आम्ही या विश्वातील काही चेहरे प्रेक्षकांसमोर आणले आहेत. हा केवळ एका गुप्तहेराचा प्रवास नाही, तर स्वराज्यासाठी सावलीसारखं काम करणाऱ्या असंख्य शूरवीरांच्या योगदानाचा आणि त्यांच्या निष्ठेचा प्रवास आहे. लवकरच प्रदर्शनाची तारीख प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. ‘जिकर हाय तर फिक्कर नाय’ या निर्धाराने आम्ही बहिर्जींची ही गाथा मोठ्या पडद्यावर साकारत आहोत.”
बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर वृत्तीला साजेसं चित्रपटाच्या प्रमोशनचं स्वरूपही तितकंच अनोखं असणार आहे. चित्रपटाबाबतची प्रत्येक बातमी योग्य वेळी आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणली जाणार आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून सध्या चित्रपटातील कलाकार, त्यांच्या भूमिका किंवा अन्य तपशीलांविषयी कोणतीही माहिती उघड करणार नाही. प्रत्येक खुलासा प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्का ठरेल. त्यामुळे ‘बहिर्जी’च्या आगामी घोषणांकडे आणि या ऐतिहासिक चित्रपटाच्या पुढील प्रवासाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.