छावाचा असाही प्रभाव! बुरहाणपूरमध्ये मुघलांच्या खजिन्याची शोधाशोध; किल्ला परिसरात तुफान गर्दी

छावाचा असाही प्रभाव! बुरहाणपूरमध्ये मुघलांच्या खजिन्याची शोधाशोध; किल्ला परिसरात तुफान गर्दी

Chhaava Movie : देश विदेशात छावा चित्रपटाला उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट लवकरच पाचशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक प्रसंगांचा समाजमनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यानंतर एक मोठी बातमी मध्य प्रदेशातून समोर येत आहे. मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूरमध्ये लोकांनी थेट मुघलांच्या खजिन्याची शोधाशोध सुरू केली. येथील एका शेतात खोदकामही सुरू केले. विशेष म्हणजे, रात्रीच्या अंधारात हातात टॉर्च घेऊन लोक खोदकाम करत होते. पाहता पाहता या लोकांनी येथे तब्बल शंभर खड्डे खोदून टाकले.

खरंतर बुरहानपूर येथील असीरगड किल्ल्याच्या आसपासच्या भागात सोने चांदीच्या नाण्यांचा खजिना असल्याची अफवा पसरली होती. यानंतर या भागात लोकांनी मोठी गर्दी केली. येथील शेतात काम करणाऱ्या काही मजुरांना मातीत सोन्याची नाणी आढळली होती. त्यामुळे या अफवेला अधिक बळकटी मिळाली. त्यामुळे गर्दी अधिकच वाढली.

सायंकाळच्या वेळी लोकांनी हातात टॉर्च, फावडे तर काही जणांनी चक्क मेटल डिटेक्टर घेऊन खजिना शोधण्यास सुरुवात केली. पाहता पाहता लोकांना येथे 100 पेक्षा जास्त खड्डे खोदूनही टाकले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनही अलर्ट झाले आणि अधिकारी या ठिकाणी हजर झाले. रात्री उशिरापर्यंत लोक या भागात खजिना शोधण्यासाठी खोदकाम करत होते.

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुमाकूळ, देशभरात 434.25 कोटी रुपयांची कमाई

छावा चित्रपटात बुरहाणपूर येथील मुघल खजिन्याचा उल्लेख करण्यात आला आहे. औरंगजेबच्या बुरहाणपूर येथील किल्ल्यात हा खजिना असल्याचे सिनेमात दाखवण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या सैन्यासह हा खजिना हस्तगत केला होता. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे खरंच या ठिकाणी मुघलांचा खजिना आजही असेल का असे लोकांना वाटत होते. त्यामुळे लोकांनी येथे खजिना शोधण्यास सुरुवात केली.

अफवा पसरली अन् शोधाशोध सुरू

बुऱ्हाणपूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या असीरगड किल्ल्याजवळून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदकाम केले जात आहे. बांधकामातून निघालेली माती येथीलच एका शेतात टाकण्यात आली होती. यात काही मजुरांना धातूची नाणी सापडली होती. यानंतर काही जणांनी छावा चित्रपटातील बुऱ्हाणपूर प्रसंगांचा दाखला देत या ठिकाणी औरंगजेबाने खजिना लपवून ठेवल्याची अफवा पसरवली. यानंतर लोकांनी याठिकाणी मोठी गर्दी करत खजिन्याची शोधाशोध सुरू केली.

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे मुघलांची छावणी होती. त्या काळात दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे हे एक मोठे शहर होते. सागरी मार्गाने होणारी वाहतूक बुऱ्हाणपूर मार्गेच दिल्लीकडे जात होती. विविध मोहिमांनंतर सैनिक ज्यावेळी या छावणीत येत तेव्हा त्यांच्याकडील खजिना येथे खड्डा खोदून लपवून ठेवत असत असा दावा आहे. त्यामुळे या भागात लोकांनी खोदकाम सुरू केले आहे. काही जणांनी नाणी मिळाल्याचा दावा केला जात आहे.

बॉक्स ऑफीसवर छावाची सिंहगर्जना, 400 कोटींचा टप्पा पार; बाहुबलीलाही पछाडले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube